सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 30 डिसेंबर 2017 (15:34 IST)

ऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्राचा देशात पहिला नंबर

देशभरात ऑनलाईन फसवणूक होण्याची तब्बल 25 हजार 800 प्रकरणं देशभरात समोर आली आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला लागला आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगसंदर्भात तब्बल 179 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. वर्षभरातील ( 21 डिसेंबर 2017 पर्यंत ) ऑनलाईन फसवणुकीची माहिती माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत दिली.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात ऑनलाईन फ्रॉडची 10 हजार 220 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये 111.85 कोटी रुपयांचा समावेश आहे. एक लाखांपेक्षा जास्त किमतीची फसवणूक झाल्याची तब्बल 380 प्रकरणं एकट्या महाराष्ट्रात समोर आली आहेत. ऑनलाईन चोरट्यांनी 12.10 कोटी रुपयांवर डल्‍ला मारला आहे.

महाराष्ट्रानंतर एक लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा सर्वाधिक फटका हरियाणाला बसला आहे. हरियाणात 238 प्रकरणांची नोंद झाली असून आठ कोटींची रक्‍कम लुबाडण्यात आली आहे. त्यानंतर कर्नाटक (221 प्रकरणं, 9.16 कोटी ), तामिळनाडू (208 प्रकरणं, 4.38 कोटी) आणि दिल्‍ली (156 प्रकरणं, 3.43 कोटी) या राज्यांचा क्रमांक येतो.