मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (09:06 IST)

PM Kisan : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांना मिळणार

श्रीकांत बंगाळे
पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत दहाव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.
 
1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी पीएम किसान योजनेच्या 10 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचे 2 हजार रुपये टाकतील, असं भारत सरकारच्या National Center Of Geo-Informatics या अधिकृत वेबसाईटनं म्हटलं आहे.
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
 
दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
 
साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
 
यंदा मात्र तिसरा हप्ता जानेवारी २०२२ मध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
 
पण, आता या योजनेशी संबंधित एक नवीन बदल समोर आला आहे.
 
ती म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला e-KYC करणं अनिवार्य आहे.
काय आहे नेमकं हे eKYC आणि ते न केल्यास काय होईल, याची माहिती आपण आता पाहणार आहोत.
 
eKYC कशी करायची?
eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.
 
आता पीएम किसान योजनेसाठी eKYC करायची असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
 
ही वेबसाईट उघडल्यावर सगळ्यात वरती तुम्हाला लाल अक्षरात एक सूचना दिसेल.
याचा अर्थ पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे.
 
आता हे करण्यासाठी इथं 2 पर्याय सांगितलेत.
 
एक म्हणजे जर तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्ही Aadhar based OTP authentication वापरून eKYC करू शकता. त्यासाठी फार्मर कॉर्नरमधील eKYC या पर्यायावर क्लिक करा. पण, जर तुम्हाला Biometric authentication करायचं असेल, तर जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल.
 
आता यातला पहिला पर्याय म्हणजे आधार कार्ड वापरून eKYC कसं करायचं ते पाहूया.
 
यासाठी तुम्हाला Farmers Corner मधील eKYC या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
त्यानंतर Aadhar Ekyc नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
 
इथं सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा क्रमांक आणि पुढच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.
 
हे टाकून झालं की समोरच्या Search या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
त्यानंतर एक नवीन पेज तुम्हाला दिसेल. इथं सुरुवातीला तुमचा आधार नंबर दिसेल. त्यापुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे.
 
मोबाईल नंबर टाकला की पुढच्या Get OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल. म्हणजेच काही आकडे पाठवले जातील. ते तुम्हाला इथल्या OTP या रकान्यात टाकायचे आहेत.
 
मग पुढे असलेल्या Submit for Auth या रकान्यात क्लिक करायचं आहे.
 
त्यानंतर EKYC is Sucessfully Submitted असा मेसेज तिथं येईल. याचा अर्थ तुमची EKYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
 
पण, इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे ही सेवा सरकारनं नुकतीच सुरू केली असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला Record not found किंवा Invalid OTP यासारखे पर्याय येतील. त्यामुळे तुम्ही काही दिवसांनंतर किंवा मग सीएससी सेंटरवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
पुढचा हप्ता मिळणार नाही?
पीएम किसान योजनेअंतर्गतचा दहावा हप्ता डिसेंबर 2021मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
 
पण, ई-केवायसी न केल्यास हा हप्ता मिळेल का, तर याचं उत्तर 'हो' असं आहे.
 
कारण, पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. तसंच सीएससीवर ई-केवायसी करून घेण्यासाठी एका खातेदारासाठी प्रत्येकी 15 रुपये आकारले जातील, अशी माहिती केंद्र सरकारच्या सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार राकेश यांनी दिली आहे.
त्यामुळे मार्च 2022 पासून पुढचे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला त्याआधी ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे.