‘केंद्र सरकारच्या नोटाबंदीची मला कोणतीही कल्पना नव्हती. मी स्वत: अमेरिकेतून नोटा बदलून घेण्यासाठी भारतात आलो होतो,’ अशा शब्दांमध्ये माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्यांना नोटाबंदीची कोणतीही कल्पना नव्हती, हे पुन्हा स्पष्ट केले.
रघुराम राजन यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राजन सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना आपण काही भारतीय नोटा अमेरिकेत घेऊन गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. ‘मी अमेरिकेत असताना नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी मला भारतात यावे लागले होते,’ असे राजन म्हणाले. आपण कधीही नोटाबंदीचे समर्थन केले नसल्याचे रघुराम राजन यांनी यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित केले. ‘नोटाबंदी तात्कालिक स्थितीत चांगली वाटत असली, तरीही तिचे दीर्घकालीन फायदे कमीच आहेत. किंबहुना नोटाबंदीमुळे भविष्यात फार काही सकारात्मक घडणार नाही,’ असे त्यांनी म्हटले.