1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 6 मार्च 2020 (10:47 IST)

Yes बँकेवरआर्थिक निर्बंध, खातेदारांची रात्रीच ATM मध्ये धाव, फक्त 50 हजार काढण्याची मुभा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस बँकेवरआर्थिक निर्बंध घातले आहे. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. 
 
50 हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना फक्त वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. 
 
येस बँकेवर सरकारने केलेल्या कारवाईमुळे येस बँकेच्या खातेदारांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळणार आहे. वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे येस बँक अडचणीत आली आहे. दरम्यान, काही खातेदारांनी पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीच एटीएममध्ये धाव घेतली. पण त्यांच्या पदरी निराशा आली. 
 
बँकेचे संचालक मंडळ गुरुवारी बरखास्त करण्यात आले. बँकेच्या खातेदारांच्या संरक्षणासाठी सरकारशी सल्लामसलत करून याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी स्पष्ट केले. आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेने आर्थिकदृष्टय़ा सक्षम पुनर्उभारी घेण्याबाबतचा विश्वासार्ह आराखडा सादर न केल्याने बँकेविरुद्ध कारवाई करावी लागल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. सरकारच्या मंजुरीनंतर येस बँकेवर प्रशासकही नियुक्त करण्यात आला. स्टेट बँकेचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार हे निर्बंध कालावधीदरम्यान येस बँकेचे प्रशासक म्हणून भूमिका बजावतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
 
या घटनेमुळे बँकेतील ठेवीदारांची चिंता वाढली आहे. पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेपाठोपाठ (पीएमसी) आर्थिक संकटात असणाऱ्या येस बँकेला घरघर लागली आहे.