1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (07:56 IST)

लिलाव सुरू करा अन्यथा कारवाई करू; सहकार विभागाची व्यापाऱ्यांना नोटीस

नाशिक  - कांद्यावर निर्यात बंदी लावल्यानंतर सुरू झालेल्या बंदवर तोडगा काढण्यासाठी म्हणून आता सहकार विभागाने व्यापाऱ्यांना तीन दिवसानंतर लिलाव सुरू करा अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्री भरती पवार यांच्या निवासस्थानी जाणारा प्रहार संघटनेचा मोर्चा पोलिसांनी नाशिक शहराच्या वेशीवर अडून त्यांना परत माघारी पाठविले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, केंद्र सरकारने नागरिकांना योग्य दरामध्ये कांदा मिळावा म्हणून हा निर्णय घेतला आहे.
 
केंद्र सरकारने गुरुवारी मध्यरात्री लागू केलेल्या निर्यात बंदी नंतर शुक्रवारी यावरून मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यामध्ये उद्रेक सुरू झाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कमी भाव मिळत असल्यामुळे बाजार समिती मध्ये सुरू असलेले कांद्याचे लिलाव बंद पाडले तर व्यापाऱ्यांनी देखील यावर नाराजी व्यक्त करून लिलाव प्रक्रियेमध्ये ते सहभागी झाले नाही. या सर्व घटनेची दखल घेऊन रविवारी सहकार विभागाने व्यापाऱ्यांना लिलाव प्रक्रिया सुरू करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला आहे.
 
यापूर्वी देखील ज्यावेळी कांद्याचे किंवा अन्य भाजीपाल्यांचे लिलाव बंद पडले त्यावेळी देखील व्यापाऱ्यांना अशा स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या नवीन वादामध्ये सहकार विभागाने उडी घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.या कारवाईच्या इशाऱ्या नंतर व्यापारी आता सोमवारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.