शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जून 2022 (15:38 IST)

मान्सून लांबला ; पेरणी थांबवा

सातारा : शेतकऱयांनी पेरणीसाठी घाई करु नये, योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे. गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी या पिकाखाली क्षेत्र वाढवण्यासाठी उत्सुक आहेत. सोयाबीनची पेरणी कधी करावी, याबद्दल शेतकऱयांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहेत. योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावर जमिनीत पुरेशी ओल आल्यावरच पेरणी करावी.
 
 जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा उलटत आला तरी मान्सून पूर्व पावसाचे म्हणवे तितके आगमन झालेले नाही. यंदा दि. 14 जुनपर्यंत 36 मी.मी इतका पाऊस झाला आहे, तोच मागील वर्षी जून महिन्यात 82 मि.मी इतका पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून पावसाची आतुरतेने वाटप पाहण्यात येत आहे, कारण सर्वच पेरण्या सध्या खोळंबल्या आहेत.
 
 पेरणीसाठी सोयाबीनच्या बियाण्यांचे प्रमाण हेक्टरी 75 किलो ग्रॅमवरुन 50 ते 55 किलोग्रॅमवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा बी. बी. एफ. प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. सोयाबीन पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेची आहे. प्रति किलो 3 ग्रॅम या प्रमाणात थायरमची बिजप्रक्रिया करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी.