सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (16:13 IST)

भाजपा अपयशी आहे, दुष्काळ जाहीर करा - सुप्रिया सुळे

पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीबाबत सरकार अतिशय असंवेदनशीलपणा दाखवत असल्याचे सुप्रिया सुळे  म्हणाल्या आहेत.  रुपयाचा दर इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव व सुशिक्षित बेरोजगार हे प्रश्न महत्त्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. यातून राज्याचे व देशाचे नुकसान होत आहे. आपण नोटबंदी करुन कोणता काळा पैसा बाहेर काढलात. नोटा छापण्यासाठी लागलेला पैसा जर एसटी प्रशासनाच्या वापरात आणला असता तर चांगले झाले असते, असेही खा. सुळे म्हणाल्या. एरंडोल तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी महिला मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.पदासाठी कोणीही लिंगभेद करु नये. जे कर्तव्यदक्ष आहेत व संवेदनशील आहेत त्यांना पद बहाल करू, असे त्यांनी सांगितले. मी टू हे जनआंदोलन होत आहे. हा विषय गंभीर आहे याची संवेदनशीलतेने विचार करणे गरजेचे आहे. सरकारने याची हाताळणी व्यवस्थित करावी, अशी मागणी त्यांनी केली.जळगाव भेटीला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनाच बैठकीतून बाहेर काढणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. हा त्या लोकप्रतिनिधी व त्या मतदारसंघाचा अपमान आहे. मुख्यमंत्री जो कोणी होईल त्याला संवेदनशीलता असणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असणे गरजेचे आहे. पण या सरकारला सत्तेची मस्ती आहे. त्यांच्याच पक्षाचा आमदार मुली उचलण्याची भाषा करतो व त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलत नाही, या बाबत त्यांनी संताप व्यक्त केला.आज ५० तालुक्यांमध्ये पाऊस झालेला नाही तरी हे सरकार दुष्काळ जाहीर करण्यास तयार नाही. पाणी कमी झाले आहे म्हणजेच दुष्काळ नाही असे मुख्यमंत्री सांगतात. एवढे असंवेदनशील हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.