नव्या तेजसचे खास आकर्षण : रेल सुंदरी पारंपरिक वेशभूषेत दिसणार
मुंबई – अहमदाबाद – मुंबई या रेल्वे या मार्गावर धावणाऱ्या पहिल्या-वहिल्या तेजसमध्ये पारंपरिक गुजराती काठियावाडी वेशभूषेतल्या रेल सुंदरी दिसणार आहेत. १७ जानेवारीला भारतातल्या या दुसऱ्या खासगी ट्रेनचं उद्घाटन होत असून १९ जानेवारीपासून ती प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.
या ट्रेनमधल्या क्रू मेंबरला ‘एअर होस्टेस’प्रमाणेच ‘रेल होस्टेस’ असं म्हटलं जाणार आहे. या युनिफॉर्ममध्ये महिलांसाठी पिवळ्या रंगाची सलवार, कुर्ता आणि डोक्यावर पांरपरिक टोपी असणार आहे. तर पुरुषांच्या युनिफॉर्ममध्ये पिवळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पँट आणि डोक्यावर पारंपरित पद्धतीची टोपी असणार आहे. ही वेशभूषा नामांकित फॅशन डिझायनर्सकडून तयार करून घेण्यात आली आहे.
ही गाडी सध्या १० डब्यांची आहे. प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांच्या मदतीला एक पुरुष आणि एक महिला ‘रेल होस्टेस’ असणार आहे. त्या प्रत्येकाला दोन युनिफॉर्म देण्यात आले आहेत. असे एकूण ४० युनिफॉर्म देण्यात आले आहेत. हे २० कर्मचारी प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवण्यासोबतच इतर मदतही करणार असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहेत. या सगळ्या रेल होस्टेसनी एविएशन हॉस्पिटॅलिटी आणि कस्टमर सर्विस इन्स्टिट्यूमधून प्रशिक्षण घेतले असून त्या कंत्राटावर काम करत आहेत.