सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 4 जानेवारी 2021 (14:01 IST)

कोरोनाच्या मंदीच्या काळातली टेस्लाच्या शेअर्समुळे अनेकजण बनले कोट्यधीश

जस्टीन हार्पर
टेस्लाच्या शेअर्सच्या वाढत्या किंमतींमुळे 2020 या वर्षात अनेक लोक कोट्यधीश झाले.
 
विशेष म्हणजे, हे लोक स्वत:ला कोट्यधीश (मिलेनिअर) किंवा अब्जाधीश (बिलिनिअर) म्हणवून घेत नाहीत, तर 'टेस्लानिअर' असं म्हणत आहेत.
 
इलॉन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 2020 मध्ये तब्बल 700 टक्क्यांहून अधिक वाढ झालीय. या वाढीसह टेस्ला जगातील सर्वांधिक किंमतीचे शेअर्स असणारी कंपनी बनलीय.
मात्र, दशकभरापूर्वीची स्थिती पाहिल्यास, या कंपनीत शेअर्स खरेदी करणाऱ्यांसाठी प्रचंड चढ-उतार असायचे. या स्थितीतही ज्यांनी टेस्लावर विश्वास ठेवला आणि सोबत राहिले, ते आता प्रचंड फायद्यात आहेत.
 
अमेरिकेतील सर्वांत मोठ्या स्टॉक इंडेक्समध्ये प्रवेश
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात टेस्ला अमेरिकेतील सर्वांत मोठ्या स्टॉक इंडेक्स असलेल्या एस अँड पी-500 चा भाग बनली. अॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक यांसारख्या कंपन्या या स्टॉक इंडेक्सच्या भाग आहेत.
टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत डिसेंबर महिन्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. या वाढीसह टेस्लानं स्टॉक इंडेक्सच्या पहिल्या दहा कंपन्यांमध्ये स्थान पटकावलं.
 
आता टेस्लाच्या स्टॉकची किंमत जनरल मोटर्स, फोर्ड, फियाट क्रायस्लर ऑटोमोबाईल्स आणि टोयोटा यांच्या एकत्रित किंमतीपेक्षाही जास्त आहे.
 
ग्राहक इलेक्ट्रिक कारच्या दिशेने
तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्यही वाटू शकतं की, आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत टेस्ला फारच कमी कारची निर्मिती करते.
 
ग्रेनाईट शेअर्स या गुंतवणूक कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह वील राइंड यांच्या मते, "ज्या गुंतवणूकदारांनी सुरुवातील शेअर्स खरेदी केले होते, ते आता फायद्यात आहेत आणि काहीजण तर कोट्यधीश बनले आहेत."
चीनमधून टेस्लाच्या कारची मागणी वाढणं हेही शेअर्सच्या किंमतीतल्या वाढीचं एक कारण आहे. त्याचसोबत, इलेक्ट्रिक कारवर सबसिडीच्या आशेनंही वाढ झाली.
 
जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक कारच्या दिशेनं ग्राहकही वळतायेत. यामुळे टेस्लासारख्या कंपन्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय.
 
अनेक गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे की, टेस्लामुळे दुसऱ्या व्यवसायांमध्येही चांगली वाढ होईल. यामध्ये स्वयंचलित ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर आणि बॅट्री पॉवर स्टोरेज यांसारख्या व्यवसायांचा समावेश आहे.
 
गरजेपेक्षा जास्त किंमत?
जून 2010 मध्ये टेस्लाच्या एका शेअरची किंमत केवळ 17 डॉलर होती. सध्या याच शेअर्सची किंमत 650 डॉलरहून अधिक झालीय.
 
कोरोनाचं संकट असतानाही 2020 मध्ये टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत कमालीची वाढ झालीय. टीकाकारांच्या मते, या कंपनीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्वं दिलं जातंय.
 
डिसेंबरच्या सुरुवातील जेपी मॉर्गन या वित्तीय संस्थेच्या विश्लेषकांनी लिहिलंय की, "टेस्लाचे शेअर्स पाहता आम्हाला केवळ असं वाटत नाहीय की, परंपरागत परिमाणांच्या तुलनेत अधिक मूल्यांकन केलं जातंय, तर नाट्यमयरित्या वाढ केली जात आहे."
 
मात्र, काही गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, टेस्लाकडे केवळ एका कार कंपनीच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे.
गुंतवणूक कंपनी ओआनडाचे वरिष्ठ विश्लेषक एडवर्ड मोया म्हणतात, "अनेक गुंतवणूकदारांना टेस्लाबाबत उत्साह वाटतो, तो एक कार कंपनी म्हणूनच. ही कंपनी कार कंपनीपेक्षा अधिक आहे. या कंपनीच्या बॅट्रीची कामगिरी उत्पन्नाचे आणखी दरवाजेही उघडेल."
 
तर राइंड म्हणतात, "जीवाश्य इंधनापासून इलेक्ट्रिक पॉवर आणि स्टोरेज बनवण्याच्या टेस्लाच्या कल्पनेचा विचार करा. या अंगानं पाहिल्यास, गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न आहे की भविष्यातील तंत्रज्ञानाचं मूल्यांकन कसं करायचं?"
 
घरांसाठीचं सोलर पॅनल आणि बॅक-अप पॉवरही टेस्ला कंपनी बनवते.
 
हे आहेत टेस्लामुळे कोट्यधीश बनलेले लोक
टेस्लाच्या उज्वल भविष्याबाबत आशावादी असलेल्या गुंतवणूकदारांची मोठी संख्या आहे.
 
लॉस एंजेलिसमधील इंजिनिअर जॅसन डी-बोल्ट यांनी टेस्लामध्ये जेव्हा पहिल्यांदा गुंतवणूक केली, तेव्हा 2500 शेअर्स 19 हजार डॉलरना खरेदी केले होते. ते सांगतात की, "2013 साली मी पहिल्यांदा टेस्लामधील टेस्ला मॉडल एसची खरेदी आणि फॅक्ट्रीचा दौरा केल्यानंतर गुंतवणुकीस सुरुवात केली."
तेव्हापासून जॅसन टेस्लाचे शेअर्स खरेदी करतायेत. त्यांच्याकडे आता 15 हजार शेअर्स आहेत, ज्यांची आताची किंमत जवळपास एक कोटी डॉलर आहे. खूप मोठ्या कालावधीपासून टेस्लाचे शेअर्स खरेदी करणाऱ्यांसाठी नक्कीच चढ-उतार राहिल्याचे ते मान्य करतात.
 
ते म्हणतात, "इलॉन मस्क आणि टेस्लावर माध्यमातून होणारी टीका पाहून व्यथित व्हायला होतं. शेअर्सच्या किंमती घसरण्यापेक्षाही जास्त वेदनादायी होतं. मला माहीत होतं, शेवटी टीकाकारांना उत्तर मिळेल."
 
जॅसन डी-बोल्ट टेस्ला शेअरहोल्डर्स क्लबचे सदस्य आहेत आणि फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून ते दुसऱ्या गुंतवणूकदारांशी चर्चा करत असतात.
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या स्कॉट टिसडेल यांनी 2013 साली मॉडल एस पाहिल्यानंतर टेस्लामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे 4000 शेअर्स आहेत, ज्यांची आजची किंमत 28 लाख डॉलर आहे.
 
ते सांगतात, "मी गुंतवणूक करणं बंद केलं नाहीय. उलट आता खरं यश मिळण्यास सुरुवात झालीय. मी खरेदी करायला सुरुवात केली नव्हती, तेव्हापासूनच लोक सांगायचे की, टेस्ला अधिक भाव देणारी कंपनी आहे."
 
पुढची आव्हानं काय आहेत?
तज्ज्ञांच्या मते, टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीची 2021 मध्ये क्वचितच पुन्हा 700 टक्क्यांची वाढ होईल. परिणामी 2020 प्रमाणे कुणी भागधारक कोट्यधीश बनण्याची शक्यताही कमी आहे.
अॅपलसारख्या कंपन्यांकडून टेस्लाला आव्हानं मिळण्याची शक्यताही तज्ज्ञ वर्तवतात.
 
अॅपल कंपनी चिनी प्रतिस्पर्धी कंपन्यांसोबत मिळून इलेक्ट्रिक कार बनवण्याची योजना पुन्हा आणू शकते.
 
ओअनडाचे मोया सांगतात, "टेस्लासमोर सर्वांत मोठं आव्हन आहे आणि त्यादृष्टीने टेस्ला जोखीमही घेऊ शकते."
 
एकाच कंपनीत गुंतवणूक करण्यापेक्षा अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात.