शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (13:43 IST)

व्होडाफोन-आयडिया एकत्रितपणे नव्या ब्रँडची घोषणा करणार?

टेलिकॉम क्षेत्रातील व्होडाफोन आणि आयडिया एकत्रितपणे नव्या ब्रँडची घोषणा करण्याची शक्यता आहे. व्होडाफोन-आयडिया एकत्र आल्यानंतरही दोन्ही ब्रँड स्वतंत्रपणे चालत होते. मात्र आता संयुक्तपणे नवा ब्रँड जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
 
ऑगस्ट 2018 मध्ये या दोन्ही कंपन्यांचं एकत्रीकरण झालं. व्होडाफोनचे बहुतांश ग्राहक शहरी भागात आहेत तर आयडियाचा संचार प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे.
 
ग्राहकांना कॉल केल्यानंतर अखंडित बोलता यावं, कॉल ड्रॉपसारख्या समस्या उद्भवू नयेत तसंच ग्राहकांसाठी नव्या योजना जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात व्होडाफोनच्या नेटवर्कसंदर्भात ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
 
जिओ आणि एअरटेल या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी व्होडाफोन-आयडियाला नव्या रुपात, नव्या ढंगात सादर व्हावं लागणार आहे.
 
व्होडाफोन ही ब्रिटिश कंपनी आहे तर आयडिया ही आदित्य बिर्लांची कंपनी आहे.
 
अॅमेझॉन आणि व्हेरीझॉन या कंपन्यांकडून झालेल्या गुंतवणुकीसंदर्भात माहिती देण्यात येईल. शेअर्सची विक्री आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून 25000 कोटी रुपयांपर्यंत रक्कम उभी करणार असल्याचं व्होडाफोन-आयडियाने स्टॉक एक्सचेंजला कळवलं आहे.
 
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने कंपनीला दणका बसला होता. 58,254 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. ही रक्कम जमा करण्यासाठी न्यायालयाने कंपनीला दहा वर्षांचा कालावधी दिला आहे.