नाताळ – एक अद्वितीय सण
नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. बहुतेकांना हा येशू नावाचा व्यक्ती कोण आहे आणि त्याचा जन्मदिन का साजरा केला जातो हे अजिबातच माहित नाही, तर काहींच्या मते येशू हे एक समाजसुधारक होते, ते एक तत्त्वज्ञानी होते, ते एक यहूदी शिक्षक होते, येशू हा अमेरिकेचा देव आहे किंवा येशू हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक आहेत इत्यादी.परमेश्वर प्रेरित पवित्र शास्त्रात आपल्याला त्याचे जीवन चरित्र वाचायला मिळते. त्यांचे जीवन अद्वितीय होते आणि म्हणूनच नाताळ एक अद्वितीय सण आहे.
प्रभू येशू यांचा जन्म अद्वितीय होता: प्रारंभी देवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा ती परिपूर्ण होती. सगळीकडे आनंदीआनंद होता. असे असताना देवाने निर्माण केलेल्या आदाम व हव्वा या पहिल्या जोडप्याने देवाचे आज्ञाउलंघन केले आणि परिणामस्वरूप जगात पाप आले. या जगाला पापमुक्त करण्यासाठी सृष्टीच्या निर्माणकर्त्या परमेश्वराने त्याच्या नेमलेल्या वेळी आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवेल त्या पुत्राचे नाव होते येशू . अर्थातच प्रभू येशू यांचा जन्म योगायोगाने झाला नसून त्याचे पूर्व भाकीत करण्यात आले होते. यशया नावाच्या देवाच्या सेवकाने प्रभू येशू यांच्या जन्माच्या ७०० वर्षं आधी म्हटले“पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.”या भविष्यवाणीप्रमाणेच झाले मरिया नामक एका इस्त्राएली कुमारिकेच्या पोटी येशूचा जन्म झाला. जन्माच्या ठिकाणाविषयी मीखा नावाच्या सेवकाने भविष्यवाणी केली होती की बेथलहेम गावी येशूचा जन्म होईल आणि तसेच झाले अशाप्रकारे कित्येक भविष्यवाण्या पूर्ण झाल्यात. हा जन्म एक काल्पनिक कथा नसून सत्य घटना आहे आणि या जन्मामुळेच आपली दिनदर्शिका इसविसन आणि इसविसनपूर्व अशी दोनभागात विभागलेली आहे.
प्रभू येशू यांची शिकवण अद्वितीय होती:येशूने दिलेली शिकवण अद्वितीय होती. त्या दिवसांतील लोक त्यांची शिकवण ऐकून आश्चर्यचकित झाले होते आणि आजही होत आहे. तेव्हापासून आजतागायत अनेकजण त्यांच्या शिकवणीमुळे प्रेरित होऊन चांगले जीवन जगत आहे. अनेकजण त्यांची शिकवण घेऊन इतरांना प्रोत्साहन देत आहे. त्यांनी शिकवले: इतरांना क्षमा करा, जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल करा. तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. त्यांची पूर्ण शिकवण नवीन करारात पाहायला मिळते.
प्रभू येशूचे कार्य अद्वितीय होते: प्रभू येशूने त्यांच्या सेवाकार्याच्या दरम्यान अनेक आजारी लोकांना बरे केले, नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पीडलेले, भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती, अशा सर्व दुखणाइतांना त्यांच्याकडे आणले, आणि त्यांनी त्यांना बरे केले. मेलेल्या लोकांना त्यांनी मरणातून उठविले.
प्रभू येशूचे मरण अद्वितीय होते:प्रभू येशूला नैसर्गिक मरण आले नाही. इझ्राएल देशातील यहूदी पुढाऱ्यांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप ठेऊन रोमी शासकातर्फे वधस्तंभावरचे क्रूर मरण सोसण्यासाठी रोमन सैनिकांकडे सोपवून दिले, प्रभू येशू त्यांच्या तावडीतून सहज सुटू शकले असते पण संपूर्ण मानवजातीसाठी त्यांचे रक्त सांडणे अगत्याचे होते कारण शास्त्र सांगते “रक्त सांडल्यावाचून पापक्षमा नाही.” (शास्त्र सांगते, “येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.”) वधस्तंभावार मरणपावल्यावर त्यांचा देह एका कबरेत ठेवण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी ते मरणातून उठले. मरण सोसल्यानंतरही त्यांनी त्यांच्या शिष्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत ते त्यांना दर्शन देत राहिले व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. ते मरणातून उठल्यानंतर पाचशे पेक्षा अधिक लोकांना दिसले, आणि मग त्यांच्या अनुयांच्या डोळ्यांदेखत स्वर्गात गेले. त्यांनी त्यांच्या अनुयायांना अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी परत येणार आहेत.
सर्व वाचकांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
राज धुदाट