गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By
Last Modified: गुरूवार, 25 डिसेंबर 2014 (11:11 IST)

प्रभू येशू म्हणजे प्रेमाचा महासागर

‘जसे आपल्यावर तसे आपल्या शेजार्‍यावर प्रेम करा, वाईटाने वाईटास नव्हे तर बर्‍याने वाईटास जिंका, जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर प्रेम करा, जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या.’अशी महान शिकवण देणार्‍या प्रभू येशू ख्रिस्ताचा आज जन्मदिन. संपूर्ण जगभर हा दिवस ख्रिसमस म्हणून साजरा करतात त्या निमित्त..
 
प्रेम, सत्य, दया, परोपकार, अहिंसा, क्षमा, शांती इत्यादी गुणांची अमूल्य देणगी या जगास येशूने दिली. प्रभू येशू ख्रिस्त  या जगामध्ये  केवळ साडेतेहतीस वर्षे जगला. या अत्यंत कमी आयुष्यामध्ये तो स्वत:साठी कधीच जगला नाही. फक्त त्याच्या पित्याच्या (यहोवा परमेश्वर) इच्छेप्रमाणे कार्य करण्यास आला व पित्याची इच्छा पूर्ण करून वधस्तंभावरील मरण सोसले. पुन्हा तिसर्‍या दिवशी उठविला गेला आणि स्वर्गात घेतला गेला. येशू या नावाचा अर्थ ‘ये आणि शुध्द हो’असा होतो. येशूची आई मरिया हिच्या उदरी  येशूची घडण होत असताना ग्रॅब्रिएल देवदूताने दर्शन देऊन ‘तुझ्या पोटी जो जन्माला येणार आहे त्याचे नाव येशू ठेव’असे सांगितले होते. येशूला दुसरेही नाव आहे ते म्हणजे इम्मानुवेल, या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. येशू या नावात उध्दार आहे. येशू या जगात होता तेव्हा त्याने उत्तमातले उत्तम कार्य केलेले आहे. महाज्ञान सांगण्यासाठी तो या जगात आला. तो देवाचा पुत्र असून ते देवासारखा होऊन गेला नाही. तर मनुष्य रूप धारण करून तो या जगात आला. 
 
ख्रिसमस म्हणजे नाताळ, 25 डिसेंबर येण्यासाठी आपणास कॅलेंडर पाहावे लागते पण देवास तुमचे कॅरेक्टर हवे आहे. निष्कलंक व पवित्र जीवन हवे आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू दिला. यासाठी की एकाचादेखील नाश होऊ नये. तर सर्वाना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आपले पाप आडभिंतीप्रमाणे आहे म्हणून आपल्या विनंत-प्रार्थना देवाकडे पोचू शकत नाहीत. म्हणून आपल्यास पापापासून दूर करण्यासाठी व या समाजाचे रक्षण करण्यासाठी तो या जगात आला.
 
प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. तो उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ हा आपल्या मेंढरासाठी आपला प्राण देतो. पवित्र शास्त्राप्रमाणे पाहिल्यास तो सृष्टीचा निर्माणकर्ता देव आहे. बायबलमध्ये नसलेले आचरण करू नका. चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देऊ नका. येशूला विसरू नका. म्हणून पवित्र शास्त्रात मार्क कृत शुभवर्तमान याच्या सातव्या अध्याच्या आठव्या वचनात स्पष्ट लिहिले आहे. देवासाठी जगू या. देवपिच्याचे महत्त्वपूर्ण कार्य करू या. या सृष्टीतील प्रत्येकास देवाचे वचन सांगू या. येशूने शिकविलेल्या शिकवणीप्रमाणे चालू या. तरच हा ख्रिस्तोत्सव साजरा करण्याचा आपणास हक्क आहे. ख्रिस्त जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा..
 
रूथ भंडारे