मी मराठी वाहिनीवरील स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित कृपासिंधूंची मालिकेने नुकतेच शंभर भाग पूर्ण केले. शंभर भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुनील राणे आणि रागिनी नंदवानी द्वारा निर्मित या मालिकेमध्ये स्वामी समर्थांची भूमिका प्रफुल सावंत यांनी साकारली आहे. मालिकेची कथा पटकथा शिरीष लाटकर यांची असून दिग्दर्शन विट्ठल डाकवे यांचे आहे.
सुनील राणे यांनी वेबदुनियाशी बोलताना सांगितले की, स्वामी समर्थांच्या जीवनावर आजवर अनेकांनी कार्यक्रम सुरु करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही यशस्वी झाले नाही. स्वामी समर्थांच्या कृपेनेच आम्ही ही मालिका तयार करू शकलो आणि मालिकेने शंभर भागही पूर्ण केले. समर्थांच्या भक्तांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही हे यश गाठू शकलो आहोत. यापुढेही ही मालिका समर्थभक्तांचे असेच मनोरंजन करीत राहील याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. ही मालिका स्वामींच्या लीला आणि भक्तांना आलेल्या अनुभवावर आधारित आहे. आम्ही आजवर केवळ दहा टक्केच स्वामींचे चरित्र दाखवू शकलो आहोत अजून ९० टक्के चरित्र प्रेक्षकांसमोर यायचे बाकी आहे. मी मराठी वाहिनी आमच्या पाठिशी उभी राहिल्यामुळेच आम्ही यश प्राप्त करू शकलो आहोत.