शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By चंद्रकांत शिंदे|
Last Modified: बुधवार, 7 एप्रिल 2010 (19:22 IST)

टाईम्सच्या कार्यक्रमाला अमिताभची दांडी

PR
PR
सुपरस्टार अमिताभ बच्चनच्या हस्ते महेश मांजरेकर लालबाग-परळ या आपल्या नव्या हिंदी मराठी चित्रपटाची ऑडियो कॅसेट प्रकाशित करणार होता. अमिताभ उपस्थित रहाणार असल्याने वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकारांची चांगलीच गर्दी झाली होती. परंतु ऐनवेळेला सांगण्यात आले की अमिताभ बच्चन काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेनेचे राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत यांच्या हस्ते चित्रपटाच्या कॅसेटचे अनावरण करण्यात आले.

त्यापूर्वी महेश मांजरेकरने आपल्या एका नव्या रुपाची झलकही उपस्थित पत्रकारांना दाखवली. या चित्रपटाद्वारा महेश मांजरेकर गायक म्हणूनही प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याने या चित्रपटात गायलेले गाणे उपस्थितांना गाऊन दाखवले. त्याचप्रमाणे चित्रपटातील एका लावणीचेही आयोजन याप्रसंगी करण्यात आले. शुक्रवार ९ एप्रिलपासून हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाची कॅसेट टाइम्स समूहाच्या जंगली कॅसेट कंपनीतर्फे बाजारात आणण्यात येत आहे. त्यामुळे टाइम्स समूहाचे अनेक अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. टाइम्स समूह या चित्रपटाशी जोडलेला गेला असल्यानेच अमिताभने कार्यक्रमाला न येण्याचे ठरवले.

ऐश्वर्या बच्चनला पोटाचा टीबी झाला असल्याने ती गरोदर राहू शकत नाही अशी बातमी मुंबई मिरर या सायंदैनिकाने दिली होती. त्यामुळे अमिताभ टाइम्स समूहावर नाराज आहे आणि त्याने मुंबई मिररला नोटिसही पाठवली आहे. टाइम्सच्या कार्यक्रमापासून अमिताभ दूर राहू इच्छितो त्यामुळेच तो आला नाही. याबाबत महेश मांजरेकरला विचारता त्याने सांगितले, ही गोष्ट खरी नाही. जया बच्चनची तब्येत ठीक नसल्याने अमिताभ बच्चन उपस्थित राहू शकले नाहीत.