शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By नितिन फलटणकर|

नाट्यसंगीत 'प्रवाही' हवे- अमोल बावडेकर

WD
WD
संगीत नाटकातील नाट्य बहुतांशवेळा दुर्लक्षिले जाते. त्यातले संगीत तेवढे गाजते. म्हणूनच संगीत नाटकांचे पुनरूज्जीवन करताना आजच्या पिढीशी नाते सांगणारे विषय घ्यायला हवेत. त्यातले संगीतही प्रवाही हवे, अशी अपेक्षा तरूण गायक-अभिनेता अमोल बावडेकर याने 'वेबदुनिया'शी बोलताना व्यक्त केली. नाटकातलं संगीत हरवल्यानंतर आता पुन्हा एकदा संगीत नाटकाची चळवळ उभी करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्या अंतर्गतच काही नाटके रंगभूमीवर आली असून अमोल त्यातला आघाडीचा कलावंत आहे. सानंद तर्फे आयोजित 'गोरा कुंभार' या नाटकाच्या निमित्ताने नितिन फलटणकर यांनी त्याच्याशी मारलेल्या गप्पांचा सारांश.....

अमोल गेल्या अनेक वर्षांपासून संगीत नाटक करत असला तरी तो मुळात एक गायक आहे. पंडित सुरेश वाडकरांचा शिष्य असलेल्या अमोलचे नाव गायक म्हणूनच लोकांपुढे आहे. 'सारेगमप' या संगीत स्पर्धेच्या माध्यमातून अमोलची हीच ओळख लोकांवर ठसली गेली. पण तो एक चांगला अभिनेताही आहे. गायकी नि देखणे व्यक्तिमत्व या दोहोंचा मेळ संगीत नाटकांसाठी चांगला असल्याचे हेरूनच त्याला या नाटकांत आणले गेले. आता तो समर्थपणे 'गायक-अभिनेता' हे बिरूद मिरवतो आहे.

अमोलने 1996 साली ‘टूरटुर’ नाटकाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले होते. त्याचवेळी संगीताची साधनाही सुरूच होती पुढे या दोहोंचा समन्वय त्याने रंगभूमीवर साधला. सध्या गाजत असलेल्या संत गोरा कुंभार आणि अवघा रंग एकचि झाला या नाटकांच्या माध्यमातून तो या दोन्ही भूमिका पार पाडतो आहे. विशेष म्हणजे एका नाटकातील अनुभवानंतर रंगभूमीलाच ‘राम राम’ करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. पण साहित्य संघाने मोठ्या मिनतवारीने त्याला संत गोरा कुंभार या नाटकासाठी राजी केले. आणि आता अमोलने नाट्यसंगीतालाच सर्वस्व अर्पण केले आहे.

WD
WD
'काळाच्या ओघात सारं काही बदलत गेलं. मराठी नाटकं मात्र आहे तिथेच आहे, हे त्याचं दुःख आहे. नाट्यातल्या संगीतबरोबरच त्यातल्या अभिनयाकडेही गंभीरपणे पहावे, असे त्याला वाटते. त्यासंदर्भात तो म्हणतो, नाटक अजरामर आहे. पण त्यात केवळ संगीतच असते, हा चुकीचा समज आहे. चित्रपटातही गाणी असतात. त्याचप्रमाणे नाट्यसंगीतातही गाणी असतात. पण म्हणून चित्रपटांना आपण 'गाणेपट' किंवा 'संगीतपट' म्हणत नाही. म्हणूनच संगीत नाटकालाही फक्त नाटक एवढेच म्हणावे.

पूर्वी मनोरंजनाचे एकमेव साधन संगीत नाटके होती, त्यामुळे प्रेक्षक केवळ संगीत ऐकण्यासाठी या नाटकांना गर्दी करत. त्यामुळे त्याचे संगीत तेवढे लोकप्रिय होत असे. आता यात बदल करण्‍याची वेळ आली असून नाटकांचे विषय, संगीत यामध्ये बदल होण्याची गरज त्याने व्यक्त केली आहे. चित्रपटांप्रमाणेच नाटकांमध्येही प्रवाही संगीताचे प्रयोग तो सध्या करत आहे.

संगीत नाटकांतून अनेक समर्थ कलावंत मराठी रंगभूमीला लाभले आहेत. त्यांच्या आख्यायिका झाल्या आहेत. या सगळयांबद्दल अमोलला नितांत आदर आहे. त्यांचा वारसा जपणे हे आपले कर्तव्य आहे ही त्याची भावना आहे. नाटकांच्याही विविध शाखा या कलाकारांनी निर्माण केल्यात. संगीत नाटक ही त्यापैकीच एक आहे, असे त्याला वाटते. आता ही शाखा मोडकळीस आल्याने आपण त्याला पुन्हा उभे करण्‍याचे आव्हान पेलल्याचे त्याचे म्हणणे आहे.

WD
WD
अमोल म्हणतो, मी माझ्या परीने या नाटकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला जर संधी मिळाली तर ‘संशय कल्लोळ’, आणि ‘लेकुरे उदंड जाहली’ या नाटकांमध्ये आधुनिक बदल करुन काम करायला त्याला नक्कीच आवडणार आहे. आगामी काळात त्याचे ‘मदनरंग’ हे नाटक येत असून, संगीत नाटकात मला अपेक्षित असलेले बदल या माध्यमातून समोर येतील, असे त्याने सांगितले.

‘सारेगमप’ च्या माध्यमातून अमोलचा सुरेल आवाज महाराष्‍ट्राने ऐकला आहे. या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर अनेक कलाकार मागे फेकले जातात. मात्र अमोलने संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करण्‍याचा ध्यास घेतला असून, आता तो केवळ नाट्संगीतांसाठीच गातो. नवीन पिढीतील तरूण संगीत नाटकाकडे तितक्या संवेदनशीलपणे पहात नसल्याची खंत त्याला आहे. पण त्याच्यासारखे अ(न)मोल कलावंत या रंगभूमीला मिळाले तर नक्कीच ही उज्ज्वल परंपरा पुढे चालू राहिल. नाही काय?