शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By चंद्रकांत शिंदे|
Last Modified: मंगळवार, 25 मे 2010 (15:06 IST)

राकेश बेदी मराठी चित्रपट निर्मितीत

PR
PR
हिंदी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमधील एक लोकप्रिय कलाकार राकेश बेदी मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरला असून त्याने आपला पहिला मराठी चित्रपट 'असा मी तसा मी' पूर्ण केला आहे. या चित्रपटाचा ध्वनीफित प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शनही हिंदीतील प्रख्यात दिग्दर्शक रमणकुमार यांनी केलेले आहे.

किरण शांताराम यांच्या हस्ते ध्वनीफित प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस बॉस एंटरटेनमेंट निर्मित 'असा मी तसा मी' जूनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

चित्रपटाची गीते लिहिली आहेत सागर पवार, पंडित साळवे आणि चंद्रकांत निरभवणे यांनी. संगीतकार आहेत कृष्णा. अलताफ, नेहा राजपाल, आनंद शिंदे यांनी गीतांना आवाज दिलेला आहे.

राकेश बेदी यांनी सांगितले, मराठीशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. अनेक मराठी कलाकारांबरोबर मी काम केलेले आहे. माझी पत्नी अनुराधा मूळची पुण्याची असल्याने माझ्या घरातही मराठी वातावरणच आहे. मी अत्यंत उत्कृष्ट मराठी बोलू शकतो. माझ्याकडे एक चांगला विषय आला होता. विषय ऐकल्यावर मला वाटले की यावर मराठीतच चांगला चित्रपट तयार होऊ शकेल म्हणून मग मी मराठी चित्रपटाला सुरुवात केली. माझ्या पत्नीसोबत या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी निर्माते शैलेंद्र गोयलही तयार झाले आणि आम्ही आता एक अत्यंत उत्कृष्ट असा चित्रपट तयार केला आहे.

एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या विद्रोहाची कथा आम्ही यात मांडली आहे. चित्रपटाची कथा रमणकुमार यांचीच असून पराग कुलकर्णी यांनी पटकथा-संवाद लिहिलेले आहेत. राहुल खंदारे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहे. मकरंद अनासपुरे सामान्य व्यक्तीची भूमिका साकारीत आहे. त्याच्यासोबत राहुल मेहेंदळे, श्वेता मेहेंदळे, रवींद्र बेर्डे, श्रृती मराठे, अजय वढावकर, जयवंत वाडकर, माधवी निमकर, अजय जाधव, गिरीश जोशी, आशा शेलार इत्यादी कलाकारांनी काम केले आहे.