‘द सायलेन्स’द्वारे अभिनय क्षेत्रात नागराज मंजुळे
‘द सायलेन्स’ हा चित्रपट नुकताच महाराष्ट्र राज्य पुरस्कार गाजवून आता कांस चित्रपट महोत्सवात पोहोचला आहे. प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमाने जगातील बर्याच नामांकित समजल्या जाणार्या चित्रपट महोत्सवांमध्ये आपले नाव कोरले आहे. जर्मन, ब्राझील, सिनेब्राझीलीया, इफ्फी, दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट, मामी फिल्म फेस्टिवल, महाराष्ट्र राज्य पुरस्कारानंतर आता द सायलेन्स चित्रपटाचा डंका फ्रांसमध्येही वाजणार आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा सिनेमा ह्या वर्षीच्या सगळ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाला पात्र ठरत आहे. गजेंद्र अहिरे ह्यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ह्या चित्रपटासाठी नामांकन जाहीर झाले आहे. द सायलेन्स या चित्रपटात रघुवीर यादव, अंजली पाटील, सैराट फेम नागराज मंजुळे, कादंबरी कदम या अनुभवी कलाकारांच्या जोडीने मुग्धा चाफेकर आणि वेदश्री महाजन या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. हल्ली समाजात वाढत चाललेल्या दुष्कृत्यांबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अशाच एका सत्यघटनेवर आधारित द सायलेंस या चित्रपटात एका लहान मुलीची व्यथा मांडण्यात आली आहे. लहानपणी घडलेली एक वाईट घटना शेवटच्या श्वासापर्यंत कसा तिचा पाठपुरावा करते याचे उत्तम चित्रण द सायलेंस या चित्रपटात करण्यात आले आहे. अश्विनी सिद्वानी, अर्पण भुखनवाला आणि नवनीत हुल्लड मोरादाबादी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अश्विनी सिद्वानी यांनी चित्रपटाची कथाही लिहिली आहे. पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकेत गजेंद्र अहिरे आपल्याला दिसणार आहेत. छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा सोरेन यांचे असून चित्रपटाचे संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे त्याचं संगीत ‘द सायलेंस’ च्या निमित्ताने इंडियन ओशन हा रॉक बँड मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.