बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (11:03 IST)

अमित चारी घेऊन येत आहेत 'बाप्पा मोरया'

प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेने होते, हे सर्वश्रुत आहे. त्यातच आता अवघ्या काही दिवसांतच बाप्पाचे आगमनही होणार आहे. हाच दुग्धशर्करा योग साधत, गायक अमित चारी गणेशोत्सवाचे वातावरण अधिकच प्रसन्न, भक्तिमय करण्यासाठी घेऊन येत आहेत, 'बाप्पा मोरया' हा खास अल्बम. पेशाने व्यावसायिक असलेले अमित चारी आपली संगीत क्षेत्रातील वाटचाल बाप्पाच्या आशीर्वादाने करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोटस कलर्स ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत 'बाप्पा मोरया' हा अल्बम नुकताच भाविकांच्या भेटीला आला आहे.
व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाऱ्या, प्राऊड टू बी अ वूमन या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या अमित चारी यांना सुरुवातीपासूनच संगीताची आवड होती, ही आवड त्यांनी 'बाप्पा मोरया' या मराठी अल्बमच्या निमित्ताने जपली. आजच्या काळात तरुणाईला प्रादेशिक भाषांची भुरळ असतानाच अमित यांनी मात्र कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी आपल्या मातृभाषेला प्राधान्य दिले. आपल्या या अल्बमविषयी अमित सांगतात, ''मुळात मी गायक नसून, संगीत ही माझी आवड आहे. आवड असेल तर सवड ही मिळतेच, त्यानुसार माझी गायनाची आवड मी जपत आहे. काही इतर प्रोजेक्ट्सवरही काम सुरु आहे. 'बाप्पा मोरया' विषयी सांगायचे तर या गाण्याची झी म्युझिक कंपनीने निवड केली यातच सर्व आले. आजपर्यंत झीकडून मराठी भक्तीगीतावर काम झाले नव्हते. त्यामुळे मी याचा पाया रोवला, असेही म्हणता येईल. यासाठी मी खरंच खूप नशीबवान आहे. या निमित्ताने नवोदितांनाही व्यासपीठ मिळेल. आजवर बॉलिवूड, पंजाबी गाण्यांमध्ये असलेली भव्यता 'बाप्पा मोरया' मध्ये दाखवण्यात आली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा यात पुरेपूर वापर करण्यात आला असून भव्य सेट, गुलालाची उधळण, उल्हासित, उत्साही वातावरण या सर्वानेच तुम्हीही निश्चितच भारावून जाल. सिनेसृष्टीत अनेक चांगले गायक आहेत, चांगली गाणी चित्रित करण्यात आली आहेत, मात्र हे गाणेही तितकेच धमाकेदार असेल. हे गाणे श्रोत्यांना नक्कीच आवडेल आणि या गणेशोत्सवात हे गाणे त्यांच्या ओठांवर सतत रेंगाळेल.' असून लवकरच संगीतातील काही नवीन प्रोजेक्ट्सच्या माध्यमातूनही ते आपल्या समोर येणार आहेत.