मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...
आजच्या तरुणाईच्या संकल्पना, भावना यातून आकाराला आलेला, तरुणाईनेच साकारलेला आणि तरुणांच्या हृदयाला चटकन भिडेल असा चित्रपट असे ज्याचे वर्णन केले जाते आहे तो ‘मन फकिरा’ ६ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचे दिग्दर्शन असलेला पहिला आणि आजच्या आघाडीच्या लोकप्रिय कलाकारांनी साकारलेला हा मराठी चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला.
‘मन फकीरा’ या रोमँटिक ड्रामाच्या गेल्या काही आठवड्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या पोस्टर, टीझर आणि गाण्यांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आज प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमधून आपल्याला दोन जोडप्यांमधील वेगळ्या व्यक्तीबद्दल असलेले प्रेम बघायला मिळत आहे. ‘प्रेम...आहे, नाही, बहुतेक, वगैरे...’ ही या सिनेमाची टॅगलाईन असून तिच्याबाबत उत्कंठा लागली असतानाच नव्याने प्रदर्शित झालेला ट्रेलर या टॅगलाईनबद्दल हलकासा खुलासा करतो. ‘एखाद्या माणसांवर आपलं प्रेम असतं, पण दुसऱ्या एका माणसाबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ शकतो’, ‘हळव्या हाताने सोडवलं तर सुटेलही कदाचित’ यांसारख्या दमदार संवादानी हा ट्रेलर आपलं लक्ष वेधतो.
प्रेमात पडलाय... लग्नासाठी स्थळ आलंय... लग्न ठरलं... लग्न झालंय... अशा प्रकारचा आशय या ट्रेलरमधून समोर येतो. भूषण-रिया यांचे मराठमोळ्या ‘कांदापोहे’ पद्धतीने लग्न होते आणि त्यानंतर सगळे काही सुरळीत सुरु असताना एका रात्री या दोघांचेही भूतकाळ समोर येतात. हे दोघे या सर्व गोष्टीला कसे समजुतदारणे सामोरे जातात आणि पुढे नक्की काय निर्णय घेतात... हे पाहण्यासाठी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची वाट पहावी लागणार आहे. पण या ट्रेलरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे, हे नक्की!
चित्रपटाची दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली की, ‘आजच्या युवकाच्या त्याच्या जोडीदाराबद्दलच्या संकल्पना या वेगळ्या आहेत. तो अधिक प्रॅक्टीकल आणि अधिक मॅच्युअर आहे. त्यांना नुसते आयुष्यभर राहणारे पती किंवा पत्नी नकोत तर खरा मित्र हवा आहे. आज प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांना नक्की आवडेल याचीही मला खात्री आहे.”
‘फ्रेम्स प्रॉडक्शन’ कंपनीचे हेमंत रूपरेल, रणजीत ठाकूर आणि ‘स्मिता फिल्म प्रॉडक्शन्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी यांची आहे.