बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (12:24 IST)

सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांचा ‘मिस यू मिस्टर’ चित्रपट २८ जून रोजी प्रदर्शित

समीर जोशी दिग्दर्शित आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गीते वैभव जोशी यांनी लिहिली असून दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली असून थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. 
 
या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. चित्रपटाचे आत्तापर्यंत प्रकाशित करण्यात आलेले ट्रेलर, टीझर, पोस्टर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
सिनेमामध्ये सिद्धार्थ चांदेकर ‘वरुण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवं विवाहित जोडपं आहे. आणि वरुणला कामानिमित्ताने काही दिवसात लंडनला जावं लागत आणि सुरु होत ते 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' यादरम्यान बऱ्याच समस्या येतात असं दिसतंय, मग ते यातुन कसा मार्ग काढतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल. हा संपूर्ण सिनेमा 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' वर भाष्य करणारा आहे, जे नवरा बायको एकमेकांपासून कामानिमित्ताने लांब राहतात त्याच्यासाठी आणि जे नवविवाहित जोडपं आहे अश्या सर्वाना हा सिनेमा खूप उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही.
 
‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होते. आपल्या करियरच्या निमित्ताने आजची तरुण जोडपी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यातील दुरावा वाढतो. प्रेमाच्या नात्याला ओढ लागते, तर कधीकधी त्यावर ताणही येतो. अर्थातच त्यांच्या नात्यामध्ये, कौटुंबिक बंधांमध्ये अनेक बदल घडतात. नव्या पिढीच्या नजरेतून, त्यांच्या जीवनशैलीचे प्रदर्शन घडवत ही कथा आकाराला येते. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
 
चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली, “मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरी' नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते.”
 
‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “मृण्मयीबरोबर काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण' नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे.”
 
‘मिस यू मिस्टर’चे दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, “ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाही, पण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतं? आणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे,” ते म्हणतात.
समीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. बस स्टॉप (२०१७), मामाच्या गावाला जाऊया (२०१४), मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) असे गाजलेले मराठी चित्रपट जोशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ‘बे दुणे दहा’, ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘एक नंबर’ या स्टार प्रवाहवरील टेलिव्हिजन मालिकांचे तसेच सोनी वाहिनी वरील 'क्राइम पेट्रोल', सास बिना सासुरलं, आणि 'किशनभाई खाकरेवाला', कलर्स वाहिनी वरील 'जीवनसाथी’ आणि  झी मराठी वरील 'भटकंती' या सर्व मालिकेचे लेखनही केले आहे.
 
मंत्रा व्हिजन ही एक बहुआयामी निर्मिती कंपनी असून अर्थपूर्ण आणि उच्च दर्जाची निर्मिती मूल्य असलेले कार्यक्रम करण्यावर तिचा भर असतो. चित्रपट, डिजिटल मीडिया, नुत्य नाटिका तसेच उर्वशी सारख्या रंगमंच कार्यक्रमात कंपनी कार्यरत आहे.