1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (20:01 IST)

’झिम्मा' चित्रपटातून गवसणार नभाच्या पल्ल्याडचं ‘माझे गाव'

'झिम्मा' चित्रपटाच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 'झिम्मा'च्या टिझरमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता शीर्षक गीताच्या प्रदर्शित होण्याने अधिकच वाढली आहे. कधी एकदा 'झिम्मा' चित्रपट पाहता येईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. असे असतानाच ''माझे गाव'' हे अतिशय वेगळ्या धाटणीचे गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले असून अपेक्षा दांडेकर यांनी हे गाणे गायले आहे. ''कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव'' असे या गाण्याचे शब्द असून हे गाणे प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते. हे गाणे ऐकताना आपले मन अतिशय शांत होते. विचारांचा वेग मंदावतो आणि ओठांवर मंद हास्य उमटते. ही या गाण्याची जादू आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
 
'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वेगवेगळ्या वयोगटाच्या आणि एकमेकींना पूर्णपणे अनोळखी असलेल्या स्त्रिया मनमुराद जगण्यासाठी काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत इंग्लंड ला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.