राजकारण्यांनी ST ची वाट लावली, ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंचा संताप
ऐकेकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या MSRTC अर्थात एसटीच्या ब्रँड अँबेसिडर असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सध्याच्या परिस्थीवर भाष्य करताना संताप व्यक्त केला आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर भाष्य करताना विक्रम गोखले म्हणाले, जगातलं बसचं एक नंबरचं नेटवर्क असलेल्या एसटीची राजकारण्यांनी वाट लावली, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.
विक्रम गोखले म्हणाले, मी एकेकाळी एसटी महामंडळाचा ब्रँड अँबेसिडर होतो. त्यावेळी एसीटवर मी बराच अभ्यास केला.
एसटीच्या एकूण अर्थशास्त्रावरती माझा लेख ही प्रसिद्ध झाला होता.त्यावर एवढा अभ्यास एसटी महामंडळातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनीही केलेला नाही, अशा प्रतिक्रिया विद्वान लोकांनी दिल्या होत्या.एसटीला, एअर इंडियाला गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केलं आहे.एअर इंडिया जगातील एकमेव एअरलाईन होती जी 60 हजार कोटी रुपयांच्या फायद्यात होती.ती आता 40 हजार कोटींच्या तोट्यात आहे. याचे कारण फक्त राजकीय लोक असल्याचे ते म्हणाले.
गोखले पुढे म्हणाले, एसटी दारोदारी जाणारी आहे, ती काय कुठली ट्रॅव्हल कंपनी नाही.एसटी रस्त्यात बंद पडली तर दुसरी एसटी मागून ताबडतोब मागवून घेतात.एसटी महामंडळासारखी 18 हजार बसेसची ताकद आहे का कोणाकडे? जगातील एक नंबरची बस यंत्रणा आहे. या यंत्रणाची राजकारण्यांनी वाट लावली.