स्वतःच्याच कोशात राहिले - प्रिया बापट
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री प्रिया बापट आता नागेश कुकुनूर यांच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून तिने डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण केले असून यात तिची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. पौर्णिमा गायकवाड नावाच्या कणखर आणि महत्वकांक्षी मुलीची व्यक्तिरेखा ती साकारत आहे. आपल्या या भूमिकेबद्दल प्रिया सांगते ''आपल्या वडिलांचे राजकीय अस्तित्व आणि त्यांचे तत्त्व जपण्यासाठी ही मुलगी राजकारणात उतरते आणि त्यात तिची लढाई इतर कोणाशी नसून तिच्या सख्ख्या भावाशी आहे. राजकारणाभोवती फिरणारी ही कथा आहे. याआधी मी अशा प्रकारची भूमिका कधीच साकारली नव्हती. त्यामुळे साहजिकच ही भूमिका साकारण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली.'' प्रियाने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. मात्र व्यक्तिगत जीवनात प्रियाची प्रतिमा एक अवखळ, चुलबुली मुलगी अशी आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखेची गरज असलेली परिपक्वता आणण्यासाठी प्रियाने बरीच मेहनत घेतली. त्याविषयी प्रिया म्हणते, ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी माझ्या वागण्या, बोलण्यात बदल करणे आवश्यक होते. याशिवाय या भूमिकेत शिरण्यासाठी मला स्वतःला मानसिकदृष्टया तयार करणे खूप महत्वाचे होते. मी माझ्याच कोशात राहिले. शक्यतो बाहेर जाणे टाळले. अशा लोकांच्या सहवासात राहिले, ज्यांना माझ्या या तयारीची, मेहनतीची जाण आहे. खूप शांत, संयमी राहण्याचा सतत प्रयत्न केला. माझ्या व्यक्तिरेखेबद्दचा नागेश सरांचा दृष्टिकोन आणि ते मला या भूमिकेत कसे बघतात, त्यांच्या या व्यक्तिरेखेकडून काय अपेक्षा आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी मी त्यांना सतत भेटले. एकंदरच ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. शिवाय इतक्या दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभवसुद्धा खूपच छान होता.
घर सांभाळणारी सर्वसाधारण गृहिणी ते सत्ता सांभाळणारी जिद्दी, महत्वकांक्षी राजकारणी. प्रियाच्या अशा दोन वेगळया छटा या वेबसिरीजमधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. भावासोबत असणाऱ्या या राजकीय खेळीत कोण विजयी होईल, हे मात्र 'सिटी ऑफ ड्रीम्स' पाहिल्यावरच कळेल.