मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2020 (14:45 IST)

बॉलिवूडला ही 'मेकअप'ची भुरळ

१०० टक्के बिनधास्त...  १०० टक्के चुलबुली... आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल... असलेल्या 'पूर्वी'ला भेटण्याची उत्सुकुता प्रेक्षकांना 'मेकअप'चे पोस्टर झळकल्यापासूनच लागली होती. टिझरमधील तिची झलक बघून ही उत्सुकता अधिकच वाढली आणि आता पूर्वीचा हा 'मेकअप' अधिकच रंगवण्यासाठी येत आहे या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर. नुकताच गणेश पंडित दिग्दर्शित 'मेकअप' चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन आणि भाईजान अर्थात सलमान खान यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. केवळ यांनीच नाही तर अवघ्या बॉलिवूडला 'मेकअप'च्या ट्रेलरने भुरळ घातली. रितेश देशमुख, इशा देओल, आफताब शिवदासानी, हुमा कुरेशी, पिया बाजपेयी, उषा जाधव यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला आहे. त्यामुळे आता बॉलिवूडही 'मेकअप'च्या रंगात रंगले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
ट्रेलरमध्ये एकीकडे लग्नासाठी मुले बघत, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतेय. त्यामुळे यातील खरी पूर्वी कोण, मेकअप'वाली पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीचा हा मेकअप कशासाठी आहे, हे जरा प्रेक्षकांना विचार करायला लावणारे आहे. ट्रेलर पाहता हा चित्रपट फूल टू धमाल दिसत आहे मात्र यात काही ट्विस्टही दिसत आहेत. हे ट्विस्ट नेमके कोणते आणि स्वप्नातल्या राजकुमाराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पूर्वीच्या आयुष्यात तिचा 'हॉट' राजकुमार येणार का, हे चित्रपट आल्यावरच कळेल. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय या सिनेमात पहिल्यांदाच डॉक्टरच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.
सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे पॅकेज  असणाऱ्या या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ आदी चेहरेही झळकणार असून हा चित्रपट लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.