मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 23 एप्रिल 2019 (18:20 IST)

धडकी भरवणारा 'जजमेंट'

ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा 'जजमेंट' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून आणि चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाबद्दल रसिकांमध्ये कमालीचे कुतूहल होते. या सिनेमाच्या थरारक ट्रेलरच्या प्रदर्शनामुळे प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आणखीनच वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर. मुळातच आपल्या समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार हा तसा संवेदनशील विषय आहे. यावर आधारित अनेक चित्रपट यापूर्वी आले परंतु हा चित्रपट मागील सर्व चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा ठरणार आहे. आता या चित्रपटाचे वेगळेपण नक्की काय असेल हे तर चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईलच, पण दमदार अभिनय, उत्कृष्ट कथा आणि संवेदनशील विषय ह्या या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. अस्तित्वाच्या लढाईसाठी 'तिच्या' जीवघेण्या संघर्षाचे भेदक चित्रण या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.

 
 
या चित्रपटात तेजश्री प्रधान, मंगेश देसाई, श्वेता पगार, माधव अभ्यंकर, सतीश सलागरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे निर्माता डॉ. प्रल्हाद खंदारे आणि सह निर्माता हर्षमोहन कृष्णात्रेय आहे. समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कादंबरीवर आधारित आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण ह्यांची ओळख आहे.