गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (08:56 IST)

'तीन अडकून सीताराम' मध्ये अडकले वैभव, संकर्षण आलोक आणि प्राजक्ता ?

TEEN ADKUN SITARAM
TEEN ADKUN SITARAM  हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच यात नेमकं काय आहे, याविषयी अनेकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे आणि या उत्सुकतेचे कारण म्हणजे चित्रपटाचे नाव. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.
 
 दुनिया गेली तेल लावत अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे. पहिल्या पोस्टरमध्ये दिसलेल्या बेड्या आता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे आणि आलोक राजवाडेच्या हातात असून ते गजाआड आहेत. त्यांच्या सोबत त्यांची साथीदार प्राजक्ता माळी दिसत आहेत. त्यामुळे आता हे कोणत्या कारणासाठी जेलमध्ये आहेत, आणि बाकीचे त्यांना का अशा नजरेने बघत आहेत तसेच चित्रपटाच्या नावाशी या सगळ्याचा नेमका काय संबंध आहे, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.
 
 चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, '' हा एक कमाल विनोदी आणि कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम मुळात भन्नाट आहे. कलाकार, निर्माते, संगीत टीम अशा सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. आम्ही आमच्या बाजूने प्रेक्षकांना शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. आता आम्हाला प्रतीक्षा आहे ती प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची.''