गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (08:37 IST)

अजरामर ठरलेलं ‘संगीत मानापमान’आता रुपेरी पडद्यावर अवतरणार

‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर तितकाच उत्तम चित्रपट अभिनेता सुबोध भावेनं दिग्दर्शित केला.या चित्रपटाला मिळेल्या अभूतपूर्व यशानंतर आता सुबोध भावे ‘संगीत मानापमान’ हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर ‘मानापमान’ चित्रपटाद्वारे सादर करणार असून पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
 
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानापमान या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. सुनील फडतरे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत मानापमान नाटक लिहिलं होतं, तर शिरीष गोपाळ देशपांडे या चित्रपटाची पटकथा लिहित आहेत. नाटकाचं संगीत गोविंदराव टेंबे यांनी केलं होतं, तर चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय करणार आहेत.
नमन नटवरा सारखी नांदी या नाटकानं दिली होती. तर नाही मी बोलत नाथा, चंद्रिका ही जणू, शुरा मी वंदिले, युवतीमना दारुण रण अशी उत्तमोत्तम पदं नाटकात होती. ही पदं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. १९११ मध्ये हे नाटक रंगमंचावर आलं होतं, त्यात बालगंधर्वांची प्रमुख भूमिका होती. आता चित्रपट रुपात हे नाटक येत असताना कोण कलाकार असतील याचं कुतुहल निर्माण झालं आहे. कट्यार काळजात घुसलीद्वारे सुबोध भावेने दमदार दिग्दर्शकीय पदार्पण केलं होतं, शंकर-एहसान-लॉय यांनी नाट्यपदांसह सूर निरागस हो, अरुणि किरणी अशी उत्तमोत्तम नवी गाणी कट्यारमधून दिली होती. त्यामुळे संगीत मानापमान नाटकातील कोणती पदं चित्रपटात येणार, नवी गाणी असणार का असे अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं टप्प्याटप्प्याने मिळतील. जागतिक पातळीवर ज्याप्रमाणे “कट्यार काळजात घुसली” चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती त्याप्रमाणेच “मानापमान” या चित्रपटाला देखील पसंती मिळेल आणि श्रवणीय संगीताची रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळेल यात शंका नाही.