शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (10:42 IST)

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लांबणीवर, आता 11 ते 18 मार्च दरम्यान महोत्सव पार पडणार

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुण्यात होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ आता 11 ते 18 मार्च 2021 दरम्यान होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता महोत्सव आठवडाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कळविले आहे.
 
महोत्सवाचे हे सलग 19 वे वर्ष असून या आधी 4 ते 11 मार्च, दरम्यान सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून देखील महोत्सव रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही फक्त तारखा बदलण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत 50 टक्के इतक्याच क्षमतेने चित्रपटगृहात महोत्सव होईल.
 
यावर्षी सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि कॅम्प परिसरातील आयनॉक्स या तीन ठिकाणी सात स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार असून  http://www.piffindia.com  या संकेतस्थळावर इच्छुकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे.