गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (14:39 IST)

अभिनेत्री ऋचा इनामदारचा यंदाचा वाढदिवस आहे स्पेशल!

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’तील मुख्य भूमिकेबरोबरच
 
अभिनेता शाहरूख खानबरोबर दोन विशेष जाहिराती आणि नव्याकोऱ्या वेबसिरीजचाही शुभारंभ 
 
नामवंत संगीतकार आणि गायक डॉ सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये अभिनेत्री ऋचा इनामदार ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यंदाचा एप्रिल महिना तिच्यासाठी खूपच स्पेशल असणार आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली, की ‘५ एप्रिलला माझा वाढदिवस असतो, यावर्षीचा वाढदिवस माझ्यासाठी खूपच वेगळा असणार आहे. कारण तीन धमाल गोष्टी प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यातील पहिली गोष्ट अशी की, ‘क्रिमिनल जस्टीस’नावाची वेबसिरीज केली आहे. ही वेब सिरीस बीबीसी आणि अप्लोस यांनी बनवली असून तिग्मांशू धुलिया यांनी दिग्दर्शित केली आहे. सिरीयस थ्रिलर, ड्रामा स्पेस आणि चांगला आशय असलेली ही वेबसिरीज आहे. ५ एप्रिलपासून तिचे एपिसोड हॉटस्टार स्पेशलमध्ये दाखवायला सुरुवात होणार आहे.
 
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता शाहरूख खानबरोबर मी चित्रीकरण केलेल्या मित्सुबिशीच्या दोन जाहिराती याच सुमारास दाखविण्यास सुरुवात होणार आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा ‘वेडिंगचा शिनेमा’ हा आगामी चित्रपट. या चित्रपटात परी आणि पक्याच्या लग्नाची गोष्ट आहे आणि त्यामध्ये असणारी परी मी साकारत आहे. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अश्या तीन वेगवेगळ्या माध्यमांमधून  प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणं, याहून एका कलाकारासाठी चांगल गिफ्ट काय असू शकत.
व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच ‘भिकारी’ या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका ऋचाने केली होती, आणि आता १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातून ऋचा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणाऱ्या या चित्रपटात मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या बहुगुणी कलाकारांबरोबर शिवराज वायचळ या अभिनेत्यासोबत ऋचा स्क्रीन शेअर करणार आहे.
 
डेन्टिस्ट्री पदवीचे शिक्षण घेत असतानाही अभिनयाची आवड जपत ऋचाने अभिनयाला सुरुवात केली. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ऋचाने या क्षेत्रात तिच्या अभिनयाची एक वेगळी छाप पाडली. अनेक भाषिक भूमिका तिने चित्रपटांमध्ये साकारल्या आहेत. ऋचाच्या अभिनयाची सुरुवातच आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित फिचर फिल्म ने झाली. याशिवाय अनेक मोठ्या कलाकारांसोबत नामवंत ब्रँड्सच्या सुमारे पन्नासपेक्षा जास्त जाहिरातीत ती झळकली आहे.
 
ऋचाला जेव्हा ‘वेडिंगचा शिनेमा’बद्दल विचारणा झाली तेव्हा ती सांगते, “मी या चित्रपटासाठी  लगेच होकार दिला. कारण डॉ. सलील कुलकर्णी हे एक संवेदनशील कलाकार आहेत यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच  चित्रपट. त्याचबरोबर चांगला विषय, कथेचा साधेपणा आणि त्यातील पात्र खूप आवडले आणि होकार दिला. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता अश्याच चांगल्या आशायाच्या चित्रपटात पुन्हा काम करायला नक्की आवडेल. 
‘वेडिंगचा शिनेमा’बद्दल बोलायचे तर, मुंबईला डॉक्टरीचे शिक्षण घेतलेली परी सासवडला मोबाईल शॉप असेल्याला पक्याच्या प्रेमात पडते आणि या दोघांचं लग्न ठरल्यावर प्री वेडिंग फिल्म करावी अशी परीची इच्छा असते ! या फिल्म शूट करण्याच्या प्रवासामध्ये परी, प्रकाश आणि ही प्री वेडिंग फिल्म बनवणारी दिग्दर्शिका उर्वी (मुक्ता बर्वे) या तिघांच्या आपापल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनात काय बदल होतो त्याचबरोबर लग्न ठरण आणि ते संपन्न होण्याच्या प्रवासामध्ये आणखी काय गंमत जमत होते हे बघण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल.
 
या चित्रपटाची कथा,पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर डॉ सलील कुलकर्णी यांनी काम केले आहे. या सर्व गोष्टींची जबाबदारी सलील यांनी उत्तम रित्या पार पाडली आहे याची प्रचिती चित्रपट पाहताना प्रेक्षकांना येईल