मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2019 (13:53 IST)

डॉ. सलील कुलकर्णी यांचा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून एक प्रसन्न चित्रपट ‘वेडिंगचा शिनेमा’

१२ एप्रिल २०१९ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित,‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांबरोबर शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी पदार्पण करणार गेली जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार,लेखक, परीक्षक, मधली सुट्टी सारख्या कार्यक्रमाचा संकल्पनाकार अश्या विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारा डॉ. सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत.
 
या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांबरोबर शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी झळकणार आहेत.या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे असून ‘वेडिंगचा शिनेमा’ हा एक निखळ आनंद देणारा एक प्रसन्न अनुभव असणार आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर दोन गाणी नुकतीच प्रदर्शित झाली आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे अशी माहिती या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 
डॉ. सलील कुलकर्णी रंगमंचावरून गायला लागले आणि "चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही" म्हणत त्याने आपली मनं जिंकली. संगीतकार म्हणून पस्तीस पेक्षा आधिक चित्रपटाची गाणी केली आणि डीबाडी डीपांग‌ किंवा देही‌ वणवा ‌पिसाटला पासून ते एकटी एकटी घाबरलीस ना पर्यंत त्याने आपल्याला आनंद दिला. दमलेल्या बाबाची कहाणी ऐकून आपले डोळे पाणावले आणि विंदा करंदीकर ह्यांच्या एका माकडाने काढले दुकान पासून अग्गोबाई ढग्गोबाई पर्यंत गाण्यांवर आपली लहान मुलं हसली, नाचली. त्याच्या बालगीतावर प्रत्येक शाळेत बालगोपाल रमले. 
 
बा. भ. बोरकर, आरती प्रभू, कुसुमाग्रज ह्यांच्या कवितांची त्याने गाणी केली आणि तरुणांना, तव नयनांचे दल हलले ग.. सारखी गाणी त्यांची वाटली. परीक्षक म्हणून सारे गम किंवा गौरव महाराष्ट्राचा मधून अनेक नवीन गायकांना घडवताना आपण त्याच्या चपखल कमेंट्स ऐकल्या. मधली सुट्टी मध्ये लहान मुलांचा सगळ्यात जवळचा मित्र होताना पाहिलं.
 
हे गजवदन.. ते‌ गायेजा.. आणि आनंद शिंदेंच्या मला उडू उडू झालाय पासून आनंद भाटे ह्यांच्या येई गा विठ्ठला पर्यंत ही रेंज थक्क करणारी आहे. लपवलेल्या काचा...शहाण्या माणसांची फॅक्टरी.. सारखी लोकप्रिय पुस्तके सुद्धा आपल्या त्याच्याच मनातून उतरलेली आहेत.
 
‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबी यांची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई-2, मुंबई पुणे मुंबई-3. बॉईज-2, बापजन्म,आम्ही दोघी, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा समावेश आहे.