सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (15:34 IST)

आनंदी गोपाळ प्रेरणादायी

सध्या हिंदीसह मराठीतही बायोपिक्सचा ट्रेंड आहे. पु. लं. देशपांडे, बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरचे चित्रपट रसिकांना भावले. आता त्याच कडीतला 'आनंदी गोपाळ' चर्चेत आहे. महाराष्ट्रात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे यासारख्या अनेकांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले. त्याचीच गोड फळं आज आपण चाखत आहोत. स्त्री शिक्षणाचा वारसा पुढे नेणारं अजून एक नाव म्हणजे गोपाळराव जोशी. महात्मा फुले, न्या. गोविंद महादेव रानडे यांच्याप्रमाणे गोपाळ रावांनीही आपल्या पत्नीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. समाजाचा विरोध पत्करून ते पत्नी आनंदीबाई जोशींचा आधार बनले. लहान वयाच्या आपल्या पत्नीला शिक्षणाची गोडी लावली. यातूनच घडली ती भारतातली पहिली महिला डॉक्टर. म्हणजेच डॉक्टर आनंदीबाई जोशी. आनंदीबाई आणि गोपाळराव यांचं हेच नातं, आनंदीबाईंचा डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास 'आनंदी गोपाळ'मध्ये पाहता येणार आहे. अभिनेता ललित प्रभाकर गोपाळरावांची भूमिका करतो आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला असून ललितचा नवा लूकही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. समीर विद्वांसने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून 'झी स्टुडिओज'ची प्रस्तुती आहे. अवघ्या दहा वर्षांच्या आनंदीबाईंचं लग्न गोपाळरावांशी झालं. स्त्री शिक्षणाबाबत आग्रही असणार्‍या गोपाळरावांनी लग्नानंतर 'मी माझ्या मनाप्रमाणे पत्नीला शिकवेन' अशी अट आनंदीबाईंच्या वडिलांना घातली होती. या प्रवासात गोपाळराव आनंदीबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या दोघांचं अत्यंत प्रेरणादायी आयुष्य रुपेरी पडावर पाहता येणार आहे. भाग्यश्री मिलिंद आनंदीबाईंची व्यक्तिरेखा करते आहे. आनंदीबाई जोशींनी परदेशात डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं, त्याभारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर हे आपण जाणतो. पण हा प्रवास किती खाचखळग्यांनी भरला होता, हे चित्रपटातून समोर येईल. या निमित्ताने पत्नीला समर्थ साथ देणारे गोपाळरावही उलगडतील.