शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2017 (13:36 IST)

नवीन वर्षाचा काव्यात्मक 'WE - चार'

शब्द जुळले म्हणजे कविता येत नाही, आणि कविताला शब्दांनी बांधता देखील येत नाही. त्यासाठी लागतात काव्यात्मक विचार... ! आणि हे विचार जर चार कवींचे असतील तर त्यातून फुलणाऱ्या कवितांना सुगंध तर येणारच! अशा या काव्यात्मक सुंगंधात रंगून जाण्याची नामी संधी नववर्षांच्या निमित्ताने श्रोत्यांना लाभली आहे. मंदार चोळकर, प्राजक्त देशमुख, समीर सामंत आणि तेजस रानडे या आजच्या तरुण पिढीतल्या चार वेगवेगळ्या बाजाचे कवी स्वत:चे नाद गंध रुप ढंग घेऊन रसिकांना अविस्मरणीय काव्यानुभवाची सफर घडवण्यास येत आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर या दोन कवींनी मराठी सिनेसृष्टीला अनेक चांगली गीते दिली आहेत. 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'यार  ईलाही', 'दिल कि तपीश, 'अरुणी किराणी' अशी उत्कृष्ट गीते समीर सामंत यांनी दिली.  'देवा तुझ्या गाभाऱ्याला' हे दुनियादारी सिनेमातलं गाणं असो किंवा 'नात्याला काही नाव नसावे' हे मितवा सिनेमातलं गाणं असो मंदार चोळकर यांच्या प्रत्येक गीतांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे.
  
२०११ साली या चार कवींना एकत्र आणत निर्माते सुजित शिंदे यांनी एक अविस्मरणीय काव्यानुभव  ’WE-चार ’ रसिकांसमोर सादर केला. विशेष म्हणजे या 'WE-चार' ला मान्यवरांची दाद आणि श्रोत्यांच्या उदंड प्रतिसाददेखील लाभला असल्यामुळे, आगामी वर्षाच्या सुरुवातीलादेखील हा प्रयोग नव्याने सादर करण्याच्या उद्देशाने हे चार विचारी कवी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. शायरी, कविता,काव्य आणि गीत अशा या WE-चारांची मैफल श्रोत्यांसाठी नववर्षाची सुरेल भेट ठरणार आहे.