सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 जानेवारी 2019 (10:01 IST)

‘व्हॉट्सॲप युजर्ससाठी लवकरच येणार ‘व्हॉट्सॲप लव’

‘व्हॉट्सॲप लव’ ह्या सिनेमाचा नुकताच पहिला टीजर मोशन पोस्टर समाज माध्यमांवर प्रदर्शित झालाय. पोस्टर आणि शीर्षक पाहून सिनेमाचा प्रकार जुजबी लक्षात येत असल्याने, विषयाबाबत सर्वच वयोगटातील स्त्री-पुरूष व्हॉट्सॲप युजर्समध्ये जास्तच उत्सुकता निर्माण झाली आहे. ज्येष्ठांना किंवा आई-बाबांना वाटेल की, हा सिनेमा व्हॉट्सॲपवरून जुळलेल्या प्रेमसंबंधांवर आधारीत असेल. आणि तरुणाईला वाटेल की, चॅटींग पार्टनर बरोबर असलेल्या बाँडींगला हे ‘व्हॉट्सॲप लव’ म्हणत असतील. काही म्हणा, चित्रपटाच्या शीर्षकावरून आणि हल्लीच्या कृत्रीम नातेसंबंधामुळे नेमका चित्रपट कशावर भाष्य करेल, हे समजणे कठीण आहे. पण, शीर्षक निश्चितच गमतीदार आहे. सिनेमात कलाकार कोण आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे. पण, प्रदर्शनाची तारीख ठळकपणे नमूद केली असल्याने पुढच्या गोष्टी लवकरच समोर येतील.
 
व्हॉट्सॲप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सॲप वरून सर्वांशी संपर्कात राहाता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. व्हॉट्सॲप वरून आलेल्या संदेशातील भावभावनांचा ओलावा किंवा शब्दांमागील भावार्थ ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबुन असतो. किंबहूना गैरसमज अनेक होतात आणि पुढे प्रसरण पावतात. पण, संपर्क साधणे आणि बंध जुळवणे ह्या व्हॉट्सॲपमुळे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे थेट संवाद साधण्यासाठी न धजावणाऱ्या व्यक्तिलाही आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं अधिक सोपे वाटू लागले आणि प्रेमही व्यक्त करण्यासाठी हल्ली व्हॉट्सॲप मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे प्रेम भावना आणि नातेसंबंधाना शाबूत ठेवण्यासाठी माध्यम ठरलेले ‘व्हॉट्सॲप’ सिनेमाचा विषय बनले आहे.
 
देश-विदेशातील बड्या कलाकारांच्या संगीतरजनींचे आयोजक हेमंतकुमार महाले यांची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शित असलेला एच.एम.जी. प्रस्तुत ‘व्हॉट्सॲप लव’ 5 एप्रिल रोजी सर्वांच्या भेटीला येणार आहे.