1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

टीम इंडियात 'यंगिस्तान'चा उदय

मनोज पोलादे

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ऐतिहासिक कसोटी विजयात तरुण क्रिकेटपटूंची भूमिका प्रमुख राहिली असून 'यंगिस्तान'च्या उदयाने भारतीय क्रिकेटच्या भविष्याबाबत देशवासीयांना आश्वस्त केले. चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, मुरली विजय, भुवनेश्वर कुमार, आर आश्विन यांनी दृष्ट लागण्याजोगी कामगिरी करून कांगारूंना नतमस्तक होण्यास भागपाडले.

तरुण भारतीय उदयोन्मुख खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी निकालास कलाटणी देणारी कामगिरी करताना प्रतिभेस साहसाची जोडही असल्याचे दाखवून दिले. शिखर धवन या स्फोटक सलामीवीराने कसोटी पदार्पणातच सर्व विक्रमांची रास घालताना आणलेल्या झंझावातात ऑस्ट्रेलियन क्रिकेट विसरून बसले होते.

चेतेश्वर पुजाराने सर्वच खेळपट्ट्यांवर आव्हानात्मक परिस्थितीत सामन्याचा निकाल लावणार्‍या खेळ्या करत राहुल द्रविड व लक्ष्मणच्या निवृत्तीनंतर भारतीय फलंदाजीतील पोकळी भरून काढली. भक्कम तंत्र असण्यासोबतच कणखर मानसिकता, धीरोदात्तपणा व आक्रमकतेचा अप्रतिम संयोग त्याच्याफलंदाजीत पाहायला मिळतो.

चारही टेस्ट मध्ये यंगिस्तानने एकाहून एक सरस कामगिरी करताना क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात घर केले. तरुण रक्तातील उत्साह, उमेद कोणत्याहीक्षेत्रात नवचैतन्य निर्माण करून कायापालट घडवून आणू शकते, हे एकदा परत सिद्ध झाले.

२०११ मधील विश्वकरंडक जिंकल्यानंतरची वर्ष भारतीय क्रिकेटसाठी दु:खद स्वप्नासारखी होती. भारतीय संघाची कामगिरी रसातळाला पोहचली होती. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारतास मानहानिकारक पराभवास सामोरे जावे लागले. भारतीय क्रिकेटचा झेंडा अटकेपार पोहचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारी भारताची सलामी जोडी अस्तास गेली होती. एकेकाळची महान भारतीय फलंदाजी अतिसामान्य होऊन गेली होती.

भारतीय क्रिकेटच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेने भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचे काम केले. या दौर्‍यात तरुण भारतीय प्रतिभा 'कोहिनूर' बनून लौकिकास आली. भारतीय क्रिकेटचा सुवर्णअध्याय लिहिण्यास आम्ही समर्थन असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यानिमित्ताने 'यंगिस्तान'ने परत एकदा भारत उदयाचे स्वप्न देशवासीयांना दाखविले आहे.