IND vs ENG 1st ODI:मोहम्मद शमीने अजित आगरकरचा विक्रम मोडला, ट्रेंट बोल्ट आणि ब्रेट लीला मागे टाकले
IND vs ENG 1st ODI: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी केली. ओव्हल येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली. मंगळवारी (12 जुलै) भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. जसप्रीत बुमराह आणि शमीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोन्ही गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांची तारांबळ उडवली. यादरम्यान शमीने एक विक्रम आपल्या नावावर केला.
शमीने वनडेत 150 बळी पूर्ण केले. त्याने जोस बटलरला आपला 150 वा बळी बनवला. भारताकडून सर्वात कमी सामन्यात 150 बळी घेणारा शमी गोलंदाज ठरला आहे. त्याने 80 व्या सामन्यात ही कामगिरी केली. या प्रकरणात शमीने माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचा विक्रम मोडला. आगरकरने 97 सामन्यात 150 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या बाबतीत अव्वल आहे. त्याने 77 सामन्यांत 150 बळी पूर्ण केले. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकने 78 सामने घेतले. शमीने अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानची बरोबरी केली. रशीदनेही शमीप्रमाणे 80 व्या सामन्यात 150 बळी पूर्ण केले. शमीने न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (81 सामने) आणि ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट ली (82सामने) यांना मागे टाकले.
शमीने 4071 चेंडू टाकत 150 बळी घेतले. या बाबतीत तो पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या खालोखाल मिचेल स्टार्क, अजंता मेंडिस, सकलेन मुश्ताक आणि राशिद खान आहेत.