शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (13:39 IST)

IND vs NZ 2nd ODI:सामना पावसामुळे रद्द, न्यूझीलंड मालिकेत 1-0 अशी आघाडी

India vs New Zealand  2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हॅमिल्टनच्या मैदानावर आज सकाळपासून पाऊस पडत होता. सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस थांबला असला तरी ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर झाला. 4.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर पाऊस परतला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा दोन्ही डावांतून 21 षटके कापण्यात आली होती. 12.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर पाऊस परतला आणि सामना रद्द करण्यात आला.
 
दुसरी वनडे पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. या सामन्यात एकूण 12.5 षटके खेळली गेली, ज्यामध्ये भारताने एक विकेट गमावून 89 धावा केल्या. हा सामना रद्द झाल्याने न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली आहे. सध्या किवी संघ मालिकेत 1-0 ने पुढे असून भारताला शेवटचा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याची संधी आहे. त्याचवेळी, शेवटच्या सामन्यात भारत हरला किंवा रद्द झाला तर न्यूझीलंड मालिका जिंकेल. 
 
भारतीय कर्णधार शिखर धवनने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार धवन आणि शुभमन गिल यांनी संथ सुरुवात केली. पाऊस आला तेव्हा भारताने 4.5 षटकात 22 धावा केल्या होत्या. पावसानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा सामना 50 षटकांऐवजी 29 षटकांचा करण्यात आला. अशा स्थितीत दोन्ही फलंदाजांनी वेगवान धावा करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रयत्नात कर्णधार धवन बाद झाला. 
 
धवनने 10 चेंडूत तीन धावा केल्या. यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आणि त्याने गिलसोबत चांगली भागीदारी केली. या दोघांनी 12.5 षटकात भारताची धावसंख्या 89 धावांपर्यंत नेली, परंतु त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. गिलने 42 चेंडूत 45 धावा केल्यानंतर या सामन्यात नाबाद राहिला. त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी, सूर्यकुमार यादवने 25 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने एकमेव विकेट घेतली.

Edited By- Priya Dixit