मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 27 मे 2020 (14:37 IST)

आयसीसीच्या नव्या नियमांवर भारतीय समालोचक नाराज

कोरोना विषाणूच्या भीतीमुळे गेले दोन महिने क्रिकेटचे सामने बंद आहेत. आता हळूहळू क्रिकेट पुन्हा रूळावर आणण्याचे आयसीसीचे प्रयत्न सुरू आहेत. याच संदर्भात आयसीसीकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सराव सत्र घेणे किंवा क्रिकेट सामने खेळवणे अशा दोन्ही बाबींसाठी आयसीसीने काही महत्त्वाचे नियम तयार केले आहेत. या नियमांमध्ये खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे अशीही सूचना करण्यात आली आहे. त्यावरून माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने प्रश्न उपस्थित केले आहेत. आयसीसीने तयार केलेली नियमावली ही खूपच अपरिपक्व वाटते. कोरोनाबाबतचे कोणतेही नियम आताच ठरवणे हे घाईचे ठरेल, कारण परिस्थिती रोज बदलते आहे. सामना सुरू असताना चेंडूला स्पर्श झाला की प्रत्येक वेळी हात धुणे किंवा सॅनिटाइझ करणे हे निव्वळ अशक्य आहे.
 
तसेच जर संघाला सामन्याआधी पुरेशा दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार आहे आणि सामने खेळताना ती जागा स्वच्छ केली जाणार आहे, तर सामना सुरू असताना अतिरिक्त नियमांची गरज काय? अन्यथा क्वारंटाइन राहण्याला काहीच अर्थ उरणार नाही, अशा शब्दात आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली.
 
नियमावलीत म्हटल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन मैदानावर केले जाईल. पण त्यानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? तिथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणे शक्य आहे का? जास्त नियमांचे कुंपण घातले तर खेळातील मजा नाहीशी होईल, असे चोप्राने सांगितले.