1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated: बुधवार, 27 जानेवारी 2021 (21:54 IST)

IndvsEng : इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक, संघ, मॅच कुठे दिसणार?

ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक मालिकाविजयाचं कवित्व सुरू असतानाच, इंग्लंडचा संघ भारतात येऊन पोहोचला आहे.
 
इंग्लंडचा संघ 4 टेस्ट, 5 ट्वेन्टी-20 आणि 3 वनडे खेळण्यासाठी भारतात दाखल झाला आहे.
 
नियमित कर्णधाराची अनुपस्थिती, दुखापतींचा ससेमिरा, अनुनभवी खेळाडू या सगळ्याला तोंड देत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात टेस्ट मालिकेत 2-1 असं नमवलं होतं.
 
इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम
5 ते 9 फेब्रुवारी- पहिली टेस्ट-चेन्नई, सकाळी 9.30पासून
 
13 ते 17फेब्रुवारी- दुसरी टेस्ट-चेन्नई, सकाळी 9.30पासून
 
24 ते 28 फेब्रुवारी- तिसरी टेस्ट-अहमदाबाद, दुपारी 2.30पासून (पिंक बॉल डे-नाईट टेस्ट)
 
4 ते 8 मार्च -अहमदाबाद, सकाळी 9.30पासून
 
............................................................
 
12 मार्च- अहमदाबाद- पहिली ट्वेन्टी-20, संध्याकाळी 7 वाजता
 
14 मार्च -अहमदाबाद- दुसरी ट्वेन्टी-20, संध्याकाळी 7 वाजता
 
16 मार्च -अहमदाबाद- तिसरी ट्वेन्टी-20, संध्याकाळी 7 वाजता
 
18 मार्च -अहमदाबाद- चौथी ट्वेन्टी-20, संध्याकाळी 7 वाजता
 
20 मार्च -अहमदाबाद- पाचवी ट्वेन्टी-20, संध्याकाळी 7 वाजता
 
.............................................................
 
23 मार्च-पुणे- पहिली वनडे, दुपारी 1.30 वाजता
 
26 मार्च-पुणे- दुसरी वनडे, दुपारी 1.30 वाजता
 
28 मार्च-पुणे- तिसरी वनडे, दुपारी 1.30 वाजता
 
चेन्नईतल्या टेस्ट रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना होणार
कोरोना नियमांमुळे खेळाडू बायो बबलमध्ये असतील. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकाच ठिकाणी जास्तीत जास्त सामने खेळवण्यात येणार आहेत. चेन्नईत दोन टेस्टनंतर दोन्ही संघ अहमदाबादला रवाना होतील. तिथे दोन टेस्ट आणि पाच वनडे असा भरगच्च कार्यक्रम आहे.
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हस्ते गेल्या वर्षी उद्घाटन झालेल्या अतिभव्य आकाराच्या आणि विक्रमी प्रेक्षकांना सामावून घेऊ शकणाऱ्या मैदानात हे सामने होतील.
 
कोरोना नियमावलीमुळे चेन्नईतील दोन टेस्ट प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहेत. पुढच्या सामन्यांसंदर्भातील निर्णय बीसीसीआय नंतर जाहीर करणार आहे. तिसरी टेस्ट पिंक बॉल अर्थात डे-नाईट टेस्ट असणार आहे. या मैदानावरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच असेल.
 
अहमदाबादनंतर दोन्ही संघ महाराष्ट्रात दाखल होणार असून, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेनजीकच्या गहुंजे इथल्या मैदानावर तीन वनडे खेळवण्यात येतील.
 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला मालिका विजय एवढा खास का?
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीला अॅडलेड टेस्टमध्ये भारतीय संघाचा डाव 36 धावांमध्ये आटोपला होता. त्यानंतर विराट कोहली पॅटर्निटी लिव्हसाठी मायदेशी परतला. भारतीय संघाचा दारुण पराभव होईल, अशी भाकितं वर्तवली जात होती.
 
मात्र अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न टेस्ट जिंकली, सिडनी टेस्ट अनिर्णित राखली तर ब्रिस्बेन टेस्टमध्ये पाचव्या दिवशी शेवटच्या काही मिनिटांमध्ये खळबळजनक विजय मिळवला.
 
दोन वर्षांपूर्वी भारतीय संघाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात टेस्ट मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. तो मालिकाविजय चमत्कार नसल्याचं भारतीय संघाने पुन्हा एकदा टेस्ट सीरिज जिंकत सिद्ध केलं.
 
मालिकेपूर्वी इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त असल्याने खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. मालिका जसजशी पुढे सरकली तसतसं मोहम्मद शमी, उमेश यादव, ऋषभ पंत, हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी दुखापतग्रस्त झाले.
 
ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारतीय संघ फिट 11 खेळाडू उभं करू शकेल का? असा प्रश्न होता. मात्र या अडथळ्यांनी खचून न जाता भारतीय संघाने दमदार सांघिक प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला मायदेशात चीतपट करण्याचा पराक्रम केला.
 
इंग्लंडची भारतातली कामगिरी
 
टेस्ट- 60
 
विजय- 13
 
हार- 19
 
अनिर्णित- 28
 
श्रीलंकेच्या छोटेखानी दौऱ्यात इंग्लंडने दोन टेस्टची मालिका 2-0 अशी जिंकत निर्भेळ यश मिळवलं. चांगल्या आत्मविश्वासासह इंग्लंडचा संघ चेन्नईत दाखल झाला आहे.
 
इंग्लडने भारतात 1933-34, 1976-77, 1979-80, 1984-85, 2012-13 अशा फक्त पाचवेळा टेस्ट प्रकारात मालिका विजय साकारला आहे.
 
इंग्लंडचा संघ पाच वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर टेस्ट मालिकेसाठी आला होता. भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली होती.
 
कोहली, हार्दिक, इशांतचं पुनरागमन
भारत - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयांक अगरवाल, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, शुभमन गिल, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर
 
स्टँडबाय- श्रीकर भरत, राहुल चहर, अभिमन्यू इश्वरन, शाहबाझ नदीम.
 
पृथ्वी शॉ बाहेर; अक्षर पटेलचा समावेश
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय साकारल्याने रहाणेलाच टेस्ट कॅप्टन करा अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र टेस्ट प्रकारात कोहलीची कर्णधार आणि बॅट्समन म्हणून कामगिरी उत्तम असल्याने कोहली परतताच त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे उपकर्णधारपदाच्या भूमिकेत असेल. अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्मा परतला आहे.
 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेले मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा या मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. सिडनी टेस्टमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने ब्रिस्बेन टेस्ट खेळू न शकलेले रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह संघात परतले आहेत.
 
मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे दुखापतग्रस्त झालेला हनुमा विहारी या मालिकेत खेळण्याची शक्यता धूसर आहे. अॅडलेड टेस्टमध्ये खराब कामगिरीनंतर संघातून वगळण्यात आलेल्या पृथ्वी शॉ याच्या नावाचा विचार झालेला नाही. मयांक अगरवालवर निवडसमितीने विश्वास ठेवला आहे.
 
के. एल. राहुलचं संघात पुनरागमन झालं आहे. आयपीएलदरम्यान विशेषज्ञ बॅट्समन म्हणून खेळणाऱ्या अष्टपैलू हार्दिक पंड्याचं संघात पुनरागमन झालं आहे.

ऑस्ट्रेलियातील मालिकेदरम्यान चांगलं प्रदर्शन करणाऱ्या मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात कायम राखण्यात आलं आहे. नेट बॉलर ते टेस्ट बॉलर अशी किमया साधणाऱ्या टी. नटराजनला मात्र संघातून वगळण्यात आलं आहे.
 
अष्टपैलू रवींद्र जडेजा नसल्याने लाईक अ लाईक रिप्लेसमेंट म्हणून अक्षर पटेलला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे.
 
कोरोनामुळे निर्माण केलेल्या बायोबबलमुळे जाण्यायेण्यावर मर्यादा असल्याने चार खेळाडूंना स्टँडबाय म्हणून समाविष्ट करण्यात आलं आहे. आपात्कालीन परिस्थितीत हे खेळाडू संघाचा भाग होऊ शकतात.
 
स्टोक्स, आर्चरचं पुनरागमन; बेअरस्टो, सॅम करनला वगळलं
इंग्लंडचा संघ- जो रूट (कर्णधार), डॉमनिक सिबले, झॅक क्राऊले, मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स.
 
स्टँडबाय- जेम्स ब्रेसय, मेसन क्रेन, साकिब मेहमूद, मॅट पार्किन्सन, ऑली रॉबिन्सन, अमर व्हिर्दी
 
इंग्लंडच्या निवडसमितीने भारत दौऱ्यातल्या चेन्नईतल्या दोन टेस्टसाठी संघ जाहीर केला आहे. श्रीलंका दौऱ्यात खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टो, सॅम करन आणि मार्क वूड यांना वगळण्यात आलं आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आलेले बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचं संघात पुनरागमन झालं आहे.
 
बॅटिंग आणि विकेटकीपिंग उत्तम करू शकणाऱ्या बेअरस्टोला वगळण्यात आल्याने इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात अष्टपैलू सॅम करनने सतवलं होतं. करनचा पहिल्या दोन टेस्टसाठी विचार करण्यात आलेला नाही.
 
जॅक लिच आणि डॉम बेस इंग्लंडचे प्रमुख स्पिनर्स असतील. त्यांच्या जोडीला मोईन अलीही आहे. कोरोना नियमावली लक्षात घेऊन इंग्लंडने सहा खेळाडूंना स्टँडबाय म्हणून आणलं आहे.
 
मॅच कुठे बघता येईल?
स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर मॅचचं प्रक्षेपण उपलब्ध असेल. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.