1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बंगळुरू , सोमवार, 29 जानेवारी 2018 (11:00 IST)

जयदेव उनाडकट आयपीएलचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला

पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये रिकाम्या हाती परतलेल्या ख्रिस गेलवर अखेरच्या फेरीत प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने लावलेली बोली आणि जयदेव उनाडकटला मिळालेली 11 कोटी 50 लाखांची रक्कम हे आयपीएलच्या दुसर्‍या दिवशीच्या लिलावाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
 
सलग दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या, तर अनेकांच्या पदरी निराशा पडली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वाधिक बोली लागलेले दोन्ही खेळाडू हे राजस्थान रॉयल्स संघाकडेच आलेले आहेत. बेन स्टोक्स 12 कोटींपेक्षा जास्त रकमेसह तर जयदेव उनाडकट 11 कोटी 50 लाखांसह राजस्थानच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मनीष पांडे आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत जयदेव उनाडकट सर्वात जास्त बोली लागलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल 11 कोटी 50 लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करून घेतलेले आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवशीही संघ मालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रित न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 
संघ मालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. गौथ कृष्णाप्पा हा खेळाडू 6 कोटी 20 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर, मोहित शर्मा, संदीप शर्मा, मोहम्द सिराज या खेळाडूंनाही चांगल्या रकमेच्या बोली लागल्या. मात्र दुसर्‍या सत्रानंतर सर्व संघ मालकांनी स्थानिक खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीवर खरेदी करण्याचा सपाटा लावला. यात किंग्ज इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी बाजी मारली. मुंबई इंडियन्सनेही काही स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे.