गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

आयसीसी क्रमवारीत विराटच किंग

येत्या गुरुवारी चॅम्पियन्स करंडकात भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. पण त्याआधीच भारतीय संघासाठी एक चांगली बातमी आलेली आहे. ती अशी की आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत धावांची बरसात करणाऱया भारतीय कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत पुन्हा अग्रस्थानी झेप घेतली आहे. कोहलीने अग्रस्थानी झेप घेताना डीव्हिलीयर्स व डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर दुसऱया तर डीव्हिलीयर्स तिसऱया स्थानी आहे. शिखर धवनने टॉप-10 मध्ये प्रवेश करताना दहावे स्थान मिळवले आहे.
 
आयसीसीने मंगळवारी वनडे क्रमवारी जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अपयशी कामगिरीचा फटका डीव्हिलीयर्सला बसला असून त्याची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. ताज्या क्रमवारीत डीव्हिलीयर्स 847 गुणासह तिसऱया स्थानी आहे. डेव्हिड वॉर्नर 861 गुणासह दुसऱया स्थानी आहे. भारतीय कर्णधार विराटने मात्र दोन स्थानांनी प्रगती करताना अग्रस्थान मिळवले आहे. सध्या विराट 862 गुणासह अव्वलस्थानी विराजमान आहे. याचवर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने अग्रस्थान मिळवले होते. पण, अवघ्या चार दिवसांतच त्याला अग्रस्थान गमवावे लागले होते. डावखुरा फलंदाज शिखर धवननेही चमकदार कामगिरीसह टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. शिखर आता 746 गुणासह 10 व्या स्थानी आहे. रोहित शर्मा 728 गुणासह 13 व्या तर महेंद्रसिंग धोनी 716 गुणासह 14 व्या स्थानी आहे.