मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (13:38 IST)

सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का ?

मुंबई- मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचे चाहते जगभरात असले तरी सध्या सचिन क्रिकेटसाठी नाही तर एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं सचिनचं नाव चर्चेत आलं असून त्यांच्या विरोधात देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. 
 
केरळमध्ये युवा काँग्रेस सचिनविरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरली असून कोची येथे युवा कॉग्रेसने सचिनच्या कट-आउटवर काळं तेल ओतून निषेध व्यक्त केला आला. शेतकरी कायद्यासंदर्भात सचिनने केलेल्या ट्वीटवर अश्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
मात्र सचिनविरोधात घडलेल्या या प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सवाल करणारं ट्वीट करत ‍विचारले आहे की 'केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?' त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेचं ट्वीट रीट्वीट केलं आहे.
 
या ट्वीटमध्ये केरळ युवा काँग्रेसने केलेल्या सचिनच्या विरोधाचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
 
काय आहे प्रकरण
शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं अनेक विदेशी सेलिब्रेटींनी ट्वीट केल्यानंतर त्याला उत्तर देण्याच्या मोहिमेअंतर्गत सचिननं बुधवारी ट्वीट केलं की 'देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, या प्रकरणात हस्तक्षेप करु नये. भारतीय भारताला चांगला ओळखतात आणि देशाचं भलं जाणतात. चला देश म्हणून एकत्र येऊ या.
 
 
सचिनच्या ट्विटमुळे काही जण दुखावले गेले असून त्याच्या विरोधात आवाज उचलत आहे.