1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (09:07 IST)

स्नेह राणाने एकाच डावात काढल्या 8 विकेट्स, गल्ली क्रिकेट ते टीम इंडिया; वाचा स्नेहचा प्रवास

“उत्तर प्रदेशातील बनारसमध्ये एक क्रिकेट सामना सुरू होता. 11 वर्षांची स्नेह राणा बॅटने चहूबाजूंना बॉल मारत होती. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट सतत सुरू होता. त्या सामन्यात 20 वर्षांच्या मुलीही खेळत होत्या. पण तिथे त्या अवघ्या 11 वर्षांच्या मुलीने खळबळ उडवून दिली होती.”
 
स्नेह राणाचा क्रिकेट प्रवास सांगताना तिचे प्रशिक्षक नरेंद्र शाह यांनी बीबीसीला ही माहिती दिली.
 
स्नेह आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. रविवारी (30 जून) चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान महिला कसोटीत एका डावात 8 बळी घेणारी स्नेह राणा दुसरी भारतीय ठरलीय.
 
उत्तरखंडमधील देहरादूनजवळच्या एका गावातून क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या स्नेहचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास कसा होता? तो आपण जाणून घेऊया.
स्नेहचा जन्म देहरादूनपासून 20 किलोमीटरवर असलेल्या सिनोला गावात झाला आहे.
 
क्रिकेटपटू स्नेहने तिच्या करिअरच्या जडणघडणीच्या काळात केवळ तिच्या कुटुंबालाच नाही तर गावातील अनेकांना क्रिकेटचं वेड लावलं आहे. त्यामुळे आता गावातील अनेक आई-वडील स्वतःच मुलींच्या हातात बॅट ठेवतात. स्नेहसारखं खेळ आणि नाव कमव, असं प्रोत्साहन देतात.
 
पण स्नेहने जेव्हा पहिल्यांदा क्रिकेटची बॅट हातात घेतली, तेव्हा मात्र तिच्या वडिलांनी तिला साफ नकार दिला होता. पण एका आठवड्याभरानंतर 9 वर्षांच्या स्नेहला वडिलांनी क्रिकेटसाठी परवानगी दिली.
 
सुरुवातीचे दिवस
स्नेहच्या वडिलांचं 2021 साली निधन झालं. त्यामुळे तिच्या घरी केवळ आईच असते. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय, पण स्नेह बाहेर क्रिकेट सामन्यांसाठी जाते, तेव्हा तिची मोठी बहीण आईची काळजी घेते.
 
स्नेहची आई विमला राणा सांगतात, "आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचणं स्नेहसाठी सोपं नव्हतं. मला दोन मुली आहेत. आम्ही मुलींवर कधीच बंधनं घातली नाहीत. पण शेजारचे आणि नातेवाईक मात्र तेव्हा कुजबूज करायचे. पण तेच लोक आता तिचं कौतुक करताना दिसतायत.”
 
त्या पुढं सांगतात, "स्नेह लहान होती तेव्हा गावात फक्त मुलंच क्रिकेट खेळत. मुली क्रिकेट खेळताना दिसत नव्हत्या. पण स्नेह एवढं चांगलं क्रिकेट खेळायची की मुले स्वत:तून तिला आपल्या टीममध्ये घ्यायचे. एकदा गावात झालेल्या स्पर्धेत ती इतकी चांगली खेळली की, त्यावेळचे क्रिकेट कोच किरण शाह यांनी तिला योग्य ट्रेनिंग द्यायचं ठरवलं.”
 
स्नेहचे आताचे कोच नरेंद्र बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, “तेव्हा उत्तराखंडची स्वतःची क्रिकेट असोसिएशन नव्हती. त्यामुळे आम्ही तिला हरियाणाला खेळायला घेऊन गेलो. तिथे त्याला अंडर-19 मध्ये फारसे खेळायला मिळाले नाही. म्हणून आम्ही पंजाब क्रिकेट संघाशी बोललो. तिथं अंडर-19 तिने क्रिकेटमध्ये दाखवलेल्या कौशल्यामुळे तिला पंजाब संघाची कर्णधार बनवलं. पुढे रेल्वे आणि भारत-A संघाचं नेतृत्व करताना स्नेहने अनेक सामने जिंकले.”
 
'भारतीय क्रिकेटची नवीन नायिका'
स्नेहच्या नसानसात क्रिकेट भरलंय, असं तिचे कोच नरेंद्र सांगतात.
 
“ती 12 वर्षांची असताना खेळादरम्यान एका 18-19 वर्षांच्या मुलाने सुमारे ताशी 120 किलोमीटर वेगाने बॉल फेकला तो तिच्या मांडीला लागला. तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण ती रडली नाही.”
 
2016 मध्ये श्रीलंकेत झालेल्या सामन्यात तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. तेव्हा स्नेहची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द जवळपास 5 वर्षे थांबली होती.
 
तेव्हा स्नेहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात होऊन दोनच वर्षे झाली होती.तिच्यासाठी तो खूप कठीण काळ होता. तिने ट्रीटमेंट घेतली आणि देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिली. एक दिवस स्नेहला फोन आला की तिची टीम इंडियामध्ये निवड झालीय. तेव्हा तिने इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला.
 
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात स्नेहची चमकदार कामगिरी पाहून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तिला ‘अ न्यू हिरो फॉर इंडिया’ असं म्हणून कौतुक केलं होतं.
 
त्या कसोटीमध्ये टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर होती आणि फॉलोऑन खेळत होती. स्नेहने 154 बॉलमध्ये नाबाद 80 रन्स केल्या आणि शेवटी सामना अनिर्णित राहिला.
 
आठव्या क्रमांकावर बॅटिंग करताना 50 हून अधिक रन्स करण्याचा हा पराक्रम 1998 नंतर महिला क्रिकेटमध्ये स्नेहने पुन्हा करून दाखवला.
 
ढेकळं आणि माती सारून क्रिकेटचं पिच तयार केलं
स्नेह राणापेक्षा सहा वर्षांनी मोठी असलेली बहीण रुची राणा नेगी यांनी बीबीसीला सांगितलं, "पूर्वी लोक फक्त मुलांचे सामने पाहायचे. आता मुलींचे सामनेही बघितले जातात. क्रिकेट हे आता पुरुषांचे जग राहिलेले नाही. आता फक्त बॅट्समन नाहीत तर बॅट्सवुमनही आहेत आणि त्या अफलातून खेळतायत. स्नेह घरी आली की लोक त्यांच्या मुलींना तिला भेटायला आणतात आणि त्यांना कसे खेळायचे ते विचारतात."
 
देहरादूनमध्ये क्रिकेटचा सराव करणाऱ्या मुलींनाही स्नेह राणाप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचायचे आहे, असं रुची सांगतात.
उत्तराखंडच्या चमोली येथून क्रिकेट शिकण्यासाठी देहरादूनला आलेली मानसी नेगी सांगते, "स्नेह दीदी इथं येते तेव्हा ती सांगते की, आमच्या काळात आम्ही ढेकळं आणि दगड बाजूला सारून क्रिकेट खेळण्यासाठी मैदान तयार करायचो. आता इथं एक चांगले मैदान आहे. यात तुम्हाला मेहनत घ्यायची आहे आणि यश मिळवायचं आहे.”
 
एका गावातल्या मैदानात मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली स्नेह आता टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी करतेय. तसंच हजारो मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
 
Published By- Priya Dixit