सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (15:10 IST)

T20 World Cup: कर्णधारपदावरून काढलं, संघातून वगळलं, मैदानातही येऊ दिलं नाही आणि त्यानेच स्पर्धा जिंकून दिली

पराग फाटक
ट्वेन्टी20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. 298 धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
अवघ्या महिन्याभरापूर्वी आयपीएल मधील सनरायझर्स हैदराबाद संघाने वॉर्नरला खराब कामगिरीमुळे निकाली काढलं होतं. महिनाभरात दमदार प्रदर्शन करत वॉर्नरने श्रेष्ठत्वाची प्रचिती घडवून आणली.
वादळी खेळी करणारा धडाकेबाज सलामीवीर अशी डेव्हिड वॉर्नरची जगभर ओळख आहे. ट्वेन्टी20 प्रकारातूनच कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या वॉर्नरने नंतर वनडे आणि टेस्टमध्येही छाप उमटवली. ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट वॉर्नरला कसा रोखायचं हा जगभरातल्या अव्वल गोलंदाजांसाठी प्रश्न असतो.
कमी चेंडूत आक्रमक खेळी करून सामन्याचं पारडं संघाच्या दिशेने फिरवण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. यामुळे वॉर्नर फक्त ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी नव्हे तर जगभरातल्या ट्वेन्टी20 संघांचा तारणहार आहे.
वॉर्नर आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार होता. कर्णधार म्हणून आणि हैदराबादचा प्रमुख फलंदाज या नात्याने वॉर्नरची कामगिरी अतिशय उत्तम अशी आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नर चौथ्या स्थानी आहे.
वॉर्नरच्या नेतृत्वातच हैदराबाद संघाने 2016 मध्ये आयपीएल जेतेपदावर कब्जा केला होता. एका संघासाठी म्हणजेच हैदराबादसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वॉर्नरच्या नावावर आहे. मात्र यंदाच्या आयपीएल हंगामात वॉर्नर आणि सनरायझर्स हैदराबाद या नात्यात वितुष्ट निर्माण झालं.
2021 हंगामातही वॉर्नरच सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. हंगामाचा पहिला टप्पा भारतात झाला होता. या टप्प्यात वॉर्नरला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
सहा सामन्यात वॉर्नरची कामगिरी 3, 54, 36, 37, 6, 57 अशी होती. वॉर्नरला मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं. पण हे आकडे वाईट म्हणावेत असेही नव्हते. हैदराबादच्या राजस्थानविरुद्धच्या लढतीत वॉर्नरला कर्णधारपदावरून बाजूला केलं असल्याचं टीम डिरेक्टर टॉम मूडी यांनी सांगितलं. कर्णधारपदी केन विल्यमसनची नियुक्ती करण्यात आली. वॉर्नरला संघातून वगळण्यात आलं.
दुर्देवाने बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा स्थगित करावी लागली. कालांतराने युएईत हंगामाचा उर्वरित टप्पा सुरू झाला. वॉर्नरकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. मात्र दोन लढतीत 0,2 अशी कामगिरी झाल्याने वॉर्नरला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आणि संघातूनही डच्चू देण्यात आला.
पुढच्या काही सामन्यांमध्ये खेळाडूंसाठी पाणी, एनर्जी ड्रिंक नेण्याचं काम वॉर्नरने केलं. त्यानंतरच्या सामन्यांमध्ये वॉर्नरला मैदानातही आणण्यात आलं नाही. वॉर्नरने हॉटेलच्या खोलीत बसून सामना पाहिला. शेवटच्या काही लढतींमध्ये वॉर्नर मैदानात बसून हैदराबाद संघाला पाठिंबा देताना दिसला होता.
आयपीएल स्पर्धेत धावांच्या राशी ओतणारा फलंदाज आणि सक्षम कर्णधार असणाऱ्या वॉर्नरवर ही वेळ ओढवल्याने जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. संघातून वगळण्यात आल्यानंतर निराश आणि डोळ्यात अश्रू असलेल्या वॉर्नरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हैदराबाद संघाला यंदाच्या हंगामात तळाच्या स्थानी राहावं लागलं.
 
कर्णधारपद कोणाला द्यायचं किंवा संघात कोणाला ठेवायचं याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेतं. पण वॉर्नरसारख्या मोठ्या खेळाडूला अशी वागणूक देणं योग्य नाही, असा सूर जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उमटला. वॉर्नरने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार व्यक्त करत सनरायझर्स संघाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं.
 
मला संघातून का वगळण्यात आलं याचं नेमकं कारण समजलं नाही, असं वॉर्नरने हैदाराबादचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर बोलताना सांगितलं. टीम डिरेक्टर टॉम मूडी, प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस, सल्लागार व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मुथय्या मुरलीधरन यांच्याप्रति मला आदर आहे, मात्र मी संघात का नाही याचं कारण समजलं असतं तर बरं झालं असतं, अशा शब्दात वॉर्नरने आपली नाराजी व्यक्त केली.
 
मनीष पांडेसंदर्भातील उद्गारांमुळे कारवाई?
आयपीएलच्या यंदाच्या भारतात झालेल्या सामन्यांदरम्यान बेंगळुरूविरुद्ध हैदराबाद संघाने मनीष पांडेला संघातून वगळलं. सामन्यानंतर बोलताना वॉर्नरने यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.
 
मनीष एक अनुभवी खेळाडू आहे. त्याने सातत्याने संघासाठी धावा केल्या आहेत. मनीषला संघात घ्यायचं की नाही हा निर्णय निवडसमितीच्या हाती होता. मला वाटतं मनीषला वगळण्याचा निर्णय अतिशय कठोर असा होता. निवडसमितीचा निर्णय मान्य करून खेळणं हे आमच्या हाती होतं.
या उद्गारातून हैदराबाद संघव्यवस्थापन आणि वॉर्नर यांच्यात बेबनाव असल्याचं स्पष्ट झालं. संघातील अनुभवी खेळाडूच्या निवडीत कर्णधार म्हणून वॉर्नरची भूमिका विचारात घेणं अपेक्षित आहे.
 
वॉर्नरचा पांडेला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. मात्र तरीही त्याला संघातून वगळण्यात आल्याने वॉर्नर आणि हैदराबाद संघव्यवस्थापन यांच्यात आलबेल नाही हे उघड झालं. या उद्गारांमुळेच वॉर्नरवर कारवाई झाली अशी चर्चा क्रिकेटरसिकांमध्ये पाहायला मिळाली.
 
विश्वचषकात दमदार पुनरागमन
ढासळलेला फॉर्म, कर्णधारपद आणि संघातील स्थान गमावणं, सोशल मीडियावरील भावुक पोस्ट यामुळे वॉर्नरचं करिअर संपतंय की काय अशी भीती चाहत्यांनी व्यक्त केली. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नरवर विश्वास ठेवला. ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीने वॉर्नरची विश्वचषकासाठीच्या संघात निवड केली.
 
संघव्यवस्थापनाच्या विश्वासाला सार्थ ठरत वॉर्नरने 298 धावा केल्या. अतिशय महत्त्वाच्या अशा फायनल आणि सेमी फायनलमध्ये वॉर्नरने मोठी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत वॉर्नरला सूर गवसला नाही. त्याला 14 धावाच करता आल्या. मात्र श्रीलंकेविरुद्ध वॉर्नरला लय सापडली आणि त्याने 65 धावांची खेळी केली. इंग्लंडविरुद्ध त्याला अवघ्या एका धावेचं योगदान देता आलं.
विश्वचषक जिंकायचा असेल तर वॉर्नरची कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची होती. बांगलादेशविरुद्धही वॉर्नरला 18धावाच करता आल्या. पण त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 89 धावांची खेळी करत वॉर्नरने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले.
 
सेमी फायनलमध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध 49, तर फायलनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 53 धावांची दिमाखदार खेळी केली.
 
वॉर्नरबाबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला विचारलं असता तो म्हणाला, "वॉर्नर मोठा खेळाडू आहे. काही लोकांनी महिनाभरापूर्वी त्याला निकालात काढलं होतं याचं मला आश्चर्य वाटतं. मी खोटं बोलणार नाही. वॉर्नर स्पर्धेत खेळणार आणि सर्वोत्तम ठरेल असं मी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांना म्हणालो होतो. वॉर्नरने संघव्यवस्थापनाचा विश्वास ठरवला".
 
सनरायझर्स हैदराबादचे सल्लागार आणि भारताचे माजी खेळाडू व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी समालोचनादरम्यान वॉर्नरचं कौतुक केलं. "मोठे खेळाडू वेगळे का असतात हे वॉर्नरने सिद्ध केलं. ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक गरज असताना मोठ्या खेळ्या केल्या. युवा खेळाडूंनी यातून खूप शिकण्यासारखं आहे", असं लक्ष्मण म्हणाले.
 
मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना वॉर्नर म्हणाला, "मला नेहमीच खेळताना चांगलं वाटत होतं. मी पुन्हा माझ्या बेसिक्सवर काम केलं. हार्ड, सिथेंटिक खेळपट्टीवर मी कसून सराव केला. 2015 विश्वचषक जिंकला त्यावेळी वाटलं तसंच आता सुखावह वाटत आहे. 2010 मध्ये ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीत इंग्लंडकडून पराभूत झालो होतो. तो पराभव जिव्हारी लागणारा होता.
 
"या संघात कमाल माणसं आहेत. सपोर्ट स्टाफचं योगदानही मोलाचं आहे. मायदेशी आणि जगभरातून मिळणारा चाहत्यांचा पाठिंबा अतिशय मोलाचा आहे. मी नेहमीच उत्साही आणि संघाच्या विजयात योगदान देण्यासाठी उत्सुक असतो. फायनलमध्ये खेळण्याचं दडपण होतं पण आम्ही करून दाखवलं".
 
वॉर्नरच्या वाटचालीत नेहमीच खंबीर साथ देणाऱ्या पत्नीने टीकाकारांना टोला लगावत त्याचं कौतुक केलं आहे.
आऊट ऑ फॉर्म, टू ओल्ड अँड स्लो- अभिनंदन असं कँडिस वॉर्नरने म्हटलं आहे.
 
सोशल मीडियावर अनेकांनी वॉर्नरने आयपीएल हंगामातील रडतानाचे तसंच ड्रिंक्स नेत असतानाचा आणि मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराचे फोटो एकत्रित टाकत वॉर्नरच्या झुंजार मनोवृत्तीचं कौतुक केलं आहे.
 
कारकीर्दीच्या सुरुवातीला काहीसा तापट वाटणारा वॉर्नर नंतर मात्र जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. खणखणीत कामगिरीच्या बरोबरीने भारतीय हिंदी गाण्यांवर नाचणारा वॉर्नर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.
वॉर्नर, त्याची पत्नी कँडिस आणि 3 मुलं भारतीय गाण्यांवर थिरकताना दिसतात. वॉर्नर अनेकदा आपल्या चाहत्यांच्या विनंतीला मान देत विशिष्ट गाण्यावर नाचतो. टिकटॉक आणि नंतर इन्स्टाग्रामवर लोकप्रिय क्रिकेट सेलिब्रेटींमध्ये वॉर्नरची गणना होते.
आयपीएलच्या 2022 मध्ये होणाऱ्या हंगामापूर्वी मोठा लिलाव होणार आहे. यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद आणि वॉर्नर यांचे दुरावलेले संबंध लक्षात घेता, पुढच्या वर्षी वॉर्नर नव्या संघासाठी खेळताना दिसू शकतो.
हैदराबाद संघाची मोट बांधण्यात, युवा खेळाडूंना पुढे आणण्यात, कर्णधार आणि मुख्य फलंदाज म्हणून वॉर्नरची कामगिरी वादातीत आहे.