सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 9 जून 2024 (14:21 IST)

T20 विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड कायम ठेवेल का?

ट्वेन्टी20 विश्वचषकात आज(9 जून) भारत आणि पाकिस्तानमधला महामुकाबला रंगणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या 'नासॉ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर' होतो आहे.या स्पर्धेत दोन्ही संघांची पहिल्या सामन्यांमधली कामगिरी एकमेकांपेक्षा बरीच वेगळी होती.
 
भारताने आपल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडवर 8 विकेट राखून आरामात विजय मिळवला होता तर दुसरीकडे पाकिस्तानला यजमान अमेरिकेच्या संघाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
एका बाजूला भारताकडे विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंतसारख्या मजबूत फलंदाजांची फळी आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडे मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाहसारख्या तेजतर्रार गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावलं आहे.
 
भारताचा संघ सध्या कागदावर जरी मजबूत दिसत असला तरी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नेमकं काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही.
 
भारत वि. पाकिस्तान सामना कुठे पाहायचा?
भारतीय वेळेनुसार रविवारी (9जून) संध्याकाळी 8 वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात होईल.
 
भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विश्वचषकाचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. तसेच ओटीटीवर तुम्हाला हा सामना बघायचा असेल तर डिस्ने + हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर विश्वचषकाच्या सगळ्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण होत आहे.
 
भारत वि. पाकिस्तान सामना कुठे पाहायचा?
भारतीय वेळेनुसार रविवारी (9जून) संध्याकाळी 8 वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात होईल.
 
भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विश्वचषकाचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. तसेच ओटीटीवर तुम्हाला हा सामना बघायचा असेल तर डिस्ने + हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर विश्वचषकाच्या सगळ्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण होत आहे.
 
अशा आहेत टीम्स
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
 
पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान
 
आजवरच्या सामन्यांत कुणाचं पारडं जड?
2007पासून सुरु झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारताने 6 सामने जिंकले असून पाकिस्तानला एका सामन्यात विजय मिळाला आहे.
 
आजवर आयसीसी विश्वचषक स्पर्धांमध्ये पाकिस्तानने भारतावर मिळवलेला तो एकमेव विजय होता.
 
टी20 विश्वचषकात झालेल्या शेवटच्या पाच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये पाचही सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
 
आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे, अलीकडच्या काळात हे दोन्ही संघ एकेमेकांच्या विरोधात द्विपक्षीय मालिका खेळलेले नाहीत.
 
भारताचे खेळाडू पाकिस्तान सुपर लीग(पीएसएल) मध्ये खेळत नाहीतर आणि पाकिस्तानचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) मध्ये खेळत नाहीत.
 
त्यामुळे आंतरराष्ट्रीय विश्वचषक आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव सोडला तरी या संघांना एकमेकांच्या विरोधात खेळण्याची तितकीशी सवय आता राहिलेली नाही आणि म्हणूनच मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये क्रिकेट रसिकांना अनेक नवीन गोष्ट पाहायला मिळाल्या आहेत.

Published By- Priya Dixit