रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (08:14 IST)

बाजीराव पेशवे जयंती विशेष

थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते.
 
पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट्ट हे बाजीरावाचे पिता. वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकला. शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्याच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बाळाजी बाजीरावावर दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघ्या १९ वर्षाचा बाजीही त्यांच्याबरोबर होता. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरायच्या किती शक्यता आहे, याचा अदमास त्या कोवळ्या वयातच बाजीने घेतला होता. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
 
बाळाजींच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमहिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले. त्याला २ कारणे होती - १) यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. 
२) थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली.
 
बाजीराव शिपाई होता. उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४०पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर,१७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), पेशावर (१७३७), कंदहार (१७३७), काबूल (१७३७), बलुचिस्तान (१७३७), तसेच भारतातील भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७ मे १७३९) या आणि अशाच ४७ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो, हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली.
 
उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि साताऱ्याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारी कुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले.
 
बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होते, म्हणूनच शाहूमहाराज म्हणत, 'मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.' एवढा एकच उद्‍गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली तरी इतिहास हेच सांगतो, वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात रूपांतर करणे ही असामान्य घटना होय. त्यांच्यामुळे भारत खंडात राजकीय पुनर्रचना झाली. शि‍वरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष झाला.