बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 30 मार्च 2020 (15:42 IST)

दशदिशा भूपाळी म्हणती

होम क्वॉरेंटाइन मुळे जणू आपलाही तिसरा नेत्र उघडल्याचा भास झाला आणि निसर्गाकडे बघण्याची नवी दृष्टी लाभली. पहाटे उठून गच्चीत जाऊन बघावे तर काय? माझे सुस्वर स्वागत झाले...... 
 
फूल पल्लव कली कालियन करत स्वागतम !
पंछी मधुर सबद कहत करत स्वागतम !
कोयल मधु कुऊक करत 
भ्रमर करिती गुंजारव !
पवन चलत सनन बहत करत स्वागतम !
 
काय नव्हते तेथे ? निसर्गाच्या विविध रुपांचे दर्शन होते. निरभ्र निळ्याशार आकाशाचे मनोहारी दर्शन, कोकीळेचे साद घालणे ऐकू आले. पोपटांचे थवे आंब्याच्या झाडावर बसून बाळ कैर्यांचा आस्वाद घेत होते. अनेकविध पक्षांची किलबिल कधीही न पाहिलेल्या पक्षांचे दुर्लभ दर्शन झाले. 
मला आवडणारा भारद्वाज पक्षी त्याचे तांबूस पिंगट रंगाचे मऊ मखमली पंख पसरत गुंजासारख्या किरमीजी रंगाच्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत ऐटीत कठड्यावरून चालत जात होता. मग क्रुप क्रुप क्रुप असा आवाज करत झाडाच्या फांदीवर जाऊन बसला त्याला प्रत्युत्तर ही कुठूनसे येत होते.
आपण जणू एखाद्या अभयारण्याची सैर करतो आहोत असा भास होत होता. अश्या विविध पक्षांचे आवाज आता भर दिवसाही ऐकू येतात. दुर्लभ झालेल्या चिऊताई पण दिसू लागल्यात हल्ली. ही मंडळी पोल्यूशन पासून तात्पुरती सुटका झाल्याचा आनंद तर मनवत नसतील ? मग लक्षात आले निसर्ग चुकत नाही आपल्यालाच कुठे ही दृष्टी असते.
 
'कुठे शोधिसि रामेश्वर अन कुठे शोधीसि काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी'
 
निसर्गाची श्रीमंती तर विनामूल्य आपल्या दारात अवतरली आहे फक्त नजर शाबूत हवी.....

लेखन - स्नेहल खंडागळे