गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : गुरूवार, 19 मार्च 2020 (17:12 IST)

वर्क फ्रॉम होम

वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट किंवा हा शब्द आपण ऐकतो. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तर बर्‍याचदा हा शब्द ऐकावयास  मिळतो. गरोदरपणात स्त्रिया घरुन काम करतात. मूल लहान असतं म्हणून घरुन काम करतात. आता तर कोरोनामुळे सगळे घरुन काम करताहेत..नवराही घरुन काम करतो. मुलीला सुट्टी तीही घरी. मुलाला शाळेला सुट्टी तोही घरी. कामवाली म्हणते, सगळे घरी मग ताई मी पण वर्क फ्रॉम होम करु का?
 
त्यावर ती म्हणाली, मग मीही वर्क फ्रॉम होम करते. यावर सगळेच हसायला लागले. तिला कळेना तिचं काय चुकलं. त्यावर मुलगा म्हणाला, 'आई, तुझं रोजच वर्क फ्रॉम होम असतं.' तिच्या डोळ्यात पाणी आलं. कोणाला काही कळू नये म्हणून ती किचनमध्ये जाऊन मनाशीच बोलू लागली. कोरोना येवो, रविवार असो, बँक हॉलिडे असो की कुठला सण असो की महिला दिन. मी रोजच घरची कामं करते. मला कधी सुट्टी असते का. किती विचार करणसारखी गोष्ट आहे ना ही? आई कुठे काय करते?
 
घरच्या स्त्रीला कायमच गृहीत धरतो ना. कसंबसं सावरत म्हणाली, 'तुम्ही घरी आहात तर दोन दिवस माहेरी जाऊ का?' त्यावर मुलगी म्हणाली, ' मग कुकिंग कोण करणार?' ती म्हणाली, 'तुला शिकवलं की कुकर लावायला. भाजी करायला. पोळ्या घेऊन या बाहेरुन.' त्यावर तिचा पुढचा प्रश्र्न तयार. 'मावशी पण येत नाहीत ग भांडी कोण घासेल माझी नखं तुटतात.' तिची नखं नसतील काहो तुटत. तिला नसेल का नेलपेंट लावावं वाटत. म्हणाली, 'तू कर रे ताईला मदत.' तर बाबा म्हणतो कसा, 'मुलगा आहे तो. त्याला कुठे भांडी घासायला लावतेस.' 
 
तीही म्हणाली, 'ठीक आहे. मी कुठेही जात नाही. कोरोना प्रकरण संपलं की मी नोकरी करेन. मलाही मझ्या पायावर उभं राहायचं.' त्यावर मुलगी म्हणाली, 'आई, तुला का करायचीय नोकरी, आम्ही देतो की पैसे.' त्यावर धीर करुन ती म्हणाली, 'मला पैसे नकोत तर माझा गहाण टाकलेला स्वाभिमान हवा. तो कुठे तुमच्या पैशात येणारे. कोरोनाचे आभार. कारण त्याने माझे डोळे उघडलेत...!'
सोनल गोडबोले