शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Updated : गुरूवार, 19 मार्च 2020 (12:27 IST)

देऊळ - भारतीय संस्कृतीचा गाभा

भारतीय समाज, भारतीय धर्म आणि भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकण्याचे चांगले साधन म्हणजे भारत भूमीच्या अंगाखांद्यावर जागोजागी विखुरलेली आपली देवळं आहेत. प्राचीन परंपरा लाभलेल्या आपल्या देशाची समृद्ध संस्कृती सातत्याने विकसित होत आली आहे. भारतीय विचार आणि तत्वज्ञानाची ओळख करून देणारे जसे अनेक ग्रंथ आहेत त्याच प्रमाणे ही देवळं देखील आहेत.
 
जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजापासून ते मूर्ती रूपातील ईश्वराच्या उपासनेद्वारे निर्गुण ब्रम्हाच्या प्राप्तीचा मार्ग शोधता येतो, हे जाणून घेण्या पर्यन्तचा भारताचा प्रवास गीतेतही सांगितला आहे. त्यामुळे अव्यक्त ब्रम्हाला रुपासी आणण्याचे, त्याला आकार देण्याचे प्रयत्न जेव्हा सुरु झाले तेव्हाच कदाचित देऊळ कल्पनेत साकारले असावे.

मूर्ती रूपातील देवाचे, ब्रम्हाचे घर कसे असावे हा विचार हळू हळू विकसित झाला. माणसाच्या राहत्या घरापेक्षा ते खचितच वेगळे असावे, उच्च दर्जाचे असावे, उठून दिसावे असे वाटणे साहजिकच होते म्हणूनच देवळाच्या निर्मितीला महत्व प्राप्त झाले. देवाला अर्पण केलेली प्रत्येक वस्तू सर्वोत्तम असावी ही मानसिकता आजही आहे. देऊळ त्याला अपवाद कसे असणार. 

मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती. ऐहिक आणि आध्यत्मिक अशा दोन अवस्थितींमध्ये माणसाची वाटचाल नेहमी आणि सातत्याने चालू असते. ऐहिक अवस्थीतीच्या मार्गावर शारीरिक उपभोग व सुखसोई सुधारण्याकडे कल असतो तर आध्यत्मिक वाटेवर माणूस आपल्या विचाराद्वारे किंवा मनोव्यापाराद्वारे धार्मिक, तात्विक, नीतिकारण, साहित्य वा कलात्मक विषयात प्रगती करतो. संस्कृती विकसित होताना या दोन्ही मार्गांवरच्या माणसाच्या प्रवासाचा ताळमेळ आवश्यक असतो. आणि तो सातत्याने घडतही असतो. एका अवस्थितीचा प्रभाव दुसरीवर आपोआप पडतो.

वास्तुशास्त्र हे दोन्ही अवस्थींचे दर्शन घडविणारे सर्वोत्तम उदाहरण होय. ऐहिक सुखासाठी जरी घर किव्हा इतर कोणतीही इमारत बांधल्या गेली असली तरी तिची रचना आणि तिचे दर्शन हे त्या समाजाच्या सामूहिक विचारांचे प्रतीकच असते. म्हणून स्थापत्यकला म्हणजे सामाजिक विचारांचा आरसाच आहे असे म्हटले जाते. पौराणिक संकल्पनेनुसार देऊळ म्हणजे अदृश्य देवतेचे दृश्य बाह्यकरण ज्यात दृश्यरूपातील मूर्ती प्रतिष्ठापिलेली असते. आपल्या प्राचीन वास्तु शास्त्रज्ञाच्या सिद्धीची प्रचिती आपल्याला सर्वांग, परीपूर्ण, सुंदर अशा देवळांचा कलात्मक रचनेतून होते. नवव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंचा काळ हा भारताचा मंदिर उभारणीचा सुवर्ण काळ म्हणता येईल. या काळात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वे पासून पश्चिमेपर्यंत अनेक देवळांची उभारणी करण्यात आली. त्या काळातील भारतीय समाजमनाचे, सांपत्तिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक वैभव या देवळांच्या बांधकामात, उभारणीत आणि रचनेत दिसते. देवळाच्या वास्तुतील एकही गट असा नाही कि ज्याची दखल वास्तुशास्त्रावरील ग्रंथांनी घेतली नाही. वस्तू शास्त्रावरील लेखातून व पोथ्यांतून देऊळ बांधण्याची यथोचित माहिती दिलेली आहे. प्राचीन हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे सगळे ब्रह्मांड एक आहे आणि त्यातील चर आणि अचर त्या परम ब्रह्माचा एक अंश आहेत. वास्तू ही संकल्पना त्या सगळ्यांना संबोधून उदयाला आली आहे. त्यात असलेले आपले एक घर अथवा एक इमारत त्या ब्रह्मांडाचाच एक भाग आहे याचा विसर पडू नये याची खबरदारी त्या शास्त्रां मध्ये घेतलेली आहे. देऊळ त्याला अपवाद कसे असतील. वास्तुशास्त्राबद्दलची माहिती अनेक ग्रंथां मध्ये सापडते. राजा भोज च्या काळातील लिहिलेले समरांगण सूत्रधार, मयाने लिहिलेले मयंत्तम तसेच, अग्निपुराण, मानसार, बृगुसंहिता, शिल्पशास्त्र, आणि अनेक असे ग्रंथ आहेत ज्यात वास्तुशास्त्राची आणि देऊळ रचनेची माहिती दिलेली आहे.
प्राचीन भारतात देवळं ही केवळ देवाची पूजा अर्चा करण्याची वास्तू नव्हती, तर सामाजिक कार्यक्रमाची, सामाजिक एकत्रीकरणाची, समाज प्रबोधनाची, कलेच्या प्रसाराची, शिक्षणाची अशी बहुउद्देशीय, बहुआयामी जागा होती. समाजातील प्रत्येक व्यक्तीला दिवसातून कितीदातरी देवळात येण्याची गरज भासत असे. प्रत्येक देवळाच्या रचनेत, अर्ध मंडप, मंडप, आणि गर्भगृह असायचेच. काही देवळांमध्ये नट मंडप आणि भोग मंडप देखील होते. खजुराहो, ओरिसा येथील देवळांमध्ये बाहेरील अंगाला प्रचंड प्रमाणात शिल्प कोरलेली आहेत. भारतीय समाजाचा जणू आरसात. तर, अबू येथील देवळं आतून सुरेख कोरलेली. कोणार्कचे सूर्य मंदिर म्हणजे एक पंचांगच आणि अचूक वेळ सांगणारे घड्याळ. हंपीचे विठ्ठलाचे मंदिर आपल्या खांबातून गाणे गाते. सरगमचे सूर तेथील खांबातून निनादात असते. एक ना दोन अशी अनेक उदाहरणे आहेत देवळांची जिथे आपल्या पूर्वजांची वैज्ञानिकता प्रत्ययास येते.
बृहदेश्वराचे तंजोर मधील देऊळ, भुवनेश्वरचे लिंगराजाचे, महाबलीपूरमचे शोर, वृंदावन, काशी, द्वारका, खजुराहोची असंख्य देवळं असोत अथवा मधुराईचे मीनाक्षीचे देऊळ, कोणार्कचे सूर्य मंदिर, अशी एक ना दोन अनेक उदाहरण देता येतील. मोजू तरी किती आणि सांगू तरी किती. सर्वाना माहिती असलेल्या या देवळांव्यतिरिक्त अशी अनेक देवळं आहेत जी फक्त आपल्याला माहित आहेत, आपल्या घराजवळ आहेत, आपल्या गावात आहेत सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, पण इतर कोणाला त्यांची माहितीच नाही. ती पर्यटन स्थळं नाहीत, ती अभिमान स्थळं नाहीत. शाळेच्या अभ्यासक्रमात त्यांचा समावेश नाही.. हा ठेवा आपल्या पूर्वजांनी मोठ्या मेहनतीने आपल्याला दिला आहे. त्याचे जतन करणे दूरच पण आपल्याला त्यांच्याअसित्वाची साधी दखल सुद्धा घ्यावीशी वाटत नाही.

त्यांनी ऊन वारा पाऊस आणि काळ यांचा मारा तर सोसला आहेच शिवाय तेराशे शतकानंतर इंग्रजांच्या आगमनापर्यन्त मुगलांच्या सगळ्या राज्यकर्त्यांच्या अत्याचाराचा माराही सोसला आहे. ज्या प्रमाणे अनेक आक्रमणकर्त्यांच्या अत्याचारानंतरही भारतीय संस्कृती अजूनही अभिमानाने आपले अस्थित्व टिकवून आहे त्याचप्रमाणे त्या संस्कृतीचे खरे प्रतीक म्हणून ही देवळं देखील उभी आहेत.

आपल्या संस्कृतीचा आपल्याला जर अभिमान बाळगायचा असेल. आपली संस्कृती पुढेही टिकवून ठेवायची असेल तर या देवळांची योग्य ती दाखल ताबडतोब घेणे फार गरजेचे आहे. समाजाची घडी बिघडत चाललेली आहे यात कुणाचेच दुमत नसणार. देवळांना जागृत करून त्यांना त्याचे पूर्वीचे वैभव आणि सोंदर्य प्रदान करण्याची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा हि देवळं समाज प्रबोधनाचे, समाज घडविण्याचे साधन बनू शकतात.

रचनात्मक प्रवृत्तीचे केंद्र- छोट्या छोट्या गोष्टीनी समाज बदलू शकतो. प्रौढ शिक्षण, कला कुसरीचे वर्ग, लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यन्त सगळ्यां साठी देवळाच्या प्रांगणात अनेक कार्यक्रम चालवले जाऊ शकतात. देवळांमध्ये वाचनालय चालवल्या जाऊ शकते. भजन कीर्तन प्रमाणेच, सामूहिक वाचनाचे तास ठरवले जाऊ शकतात. व्यसन आणि व्यभिचार याला आळा घालण्याचे प्रकल्प राबवले जाऊ शकतात.

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य केंद्र- योग केंद्र, आरोग्य केंद्र, ही देवालये सहजच बानू शकतात. कोरोना व्हायरसचा सद्या पदृभाव आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी घ्यावी लागणारी दक्षता व त्याचे शिक्षण देवळातून दिल्या गेलेतर त्याचे महत्व आणि परिणाम सकारात्मक होतील. लोकांना सहज पटतील. ही काही छोटी, थोडीशी उदाहरणे मी इथे दिली आहेत. पण यावर अजून विचार झाला पाहिजे. उहापोह झाला पाहिजे. मंथनाला सुरवात व्हायला हवी. सकारात्मक समाजाकडे वाटचालकरण्याचे हे एक पाऊल असेल. जोमाने ते पाउल पुढे टाकू यात.
 
डॉ . उज्वला चक्रदेव