बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 30 मार्च 2020 (14:32 IST)

'कुटुंब व्यवस्था'

विकासाच्या नावाखाली प्रचंड वेगाने धावणाऱ्या मानवाला दैवी संकेतच मिळाला आहे जणू. मानवI थांब,विश्रांती घे आणि शांत झालास कि विचार कर. कशा साठी धावत होतास? काय तुला हवं होतं ? तुझी दिशा चुकली होती हे तरी मान्य कर. शंभर गुन्हे माफ तुला. पण शंभरच्या वर तर नाही ना झालेत गुन्हे तुझे? येणारI काळच ठरवेल. गेले दहा दिवस आपण घरात आहोत. आपल्या कुटुंबा सोबत आहोत.
 
भारतीय कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाचा आणि भारतीय संस्कृतीचा कणा. बऱ्याच प्रगत देशांमध्ये ही कुटुंब व्यवस्था कोलमडली आहे. भारताचीही त्या दिशेने वाटचाल सुरु झालेली होती. परिस्थिती भारतात फार गंभीर म्हणावी तशी नाही. गेल्याकाही वर्षात भारताने प्रगती केली असली तरीही भारत मुख्यतः खेड्यातच वसतो अजूनही. आणि आपल्या खेड्यांमध्ये कुटुंब व्यवस्था बऱ्या पैकी शाबूत आहे असे म्हणायला हरकत नाही. आय टी मध्ये काम करणारा तरुण भारत, अमेरिकेसाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणारा भारत, लहान वयात भरपूर पैसे खिशात मिरवणारा भारत, दोन वेळेस वरण  भाता ऐवजी पिझ्झा बर्गर खाण्यात धन्यता मानणारा हा so called मॉडर्न आणि तरुण भारत, संपूर्ण भारताच्या जनसंख्येच्या २% हुन जास्त नाही. या धावणाऱ्या तरुण भारताकडे बाकी भारत विस्मयाने अचंभित होऊन पाहत होता. आणि काही वर्ष कौतुकात गेले. ' माझा मुलगा अमेरिकेत आहे' हे सांगण्यात धन्यता मानणाऱ्या पिढीला हळू हळू त्या मागे सोसावी लागणारा एकाकी पणा जाणवला. कुटुंब व्यवस्थेची पाळंमुळं जेव्हा खिळखिळी होताना दिसलीत, मजल जेव्हा DINK (डबल इनकम नो कीड) सारखे शब्द सर्रास वापरात येऊ लागलेत, तेव्हा हा प्रगल्भ भारत कुठेतरी हेलावला, सावध झाला.
कुटुंब व्यवस्था हे संस्कृती चे सुसंस्कृत जीवनाचे प्रतीक म्हणायला हरकत नाही. जंगलात राहणाय्रा आदी मानवाने एकत्र राहण्याचे अनेक प्रयोग केलेत. त्यातून निपजलेली  आणि स्थायी झालेली व्यवस्था म्हणजे 'कुटुंब व्यवस्था' मानवी सभ्यतेच्या सुरवातीपासूनच कुटुंब व्यवस्था त्याचा घटक आहे. हळू हळू विकसित होऊन हि व्यवस्था माणसाच्या सामाजिक अस्थित्वाचा अविभाज्य भाग बनली. 'लग्न' या व्यवस्थेचा मुख्य सोहळा. या व्यवस्थेचा पाया. सैयम आणि समृद्धी चे प्रतीक. दोन व्यक्तींचे लग्न झाले कि नव्या कुटुंबाची सुरवात होते. जुन्या कुटुंबाचा विस्तार होतो. जुने कुटुंब तुटत नाही. अशा अनेक छोट्या छोट्या विस्तारित कुटुंबाच्या समूहालाच समाज म्हणायचे. भारताची पूर्वापार चालत आलेली आणि विकसित झालेली ही संकल्पना थेट 'वसुधैव कुटुंबकं' पर्यन्त जाऊन पोहोचली. 
 
आपण विसरलो नाही आहोत हि गोष्ट. थोडासा स्मृती भ्रंश झाला होता जरूर. समाजाला ग्लानी अली होती. 
कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे आणि social distancingच्या नावाखाली सगळी कुटुंबं एकत्र आलीत पुन्हा एकदा. आपल्या कुटुंबीयांची नव्याने ओळख करून घ्यायची संधी देवाने आपल्याला दिली आहे. कदाचित जाणीव पूर्वक दिली आहे. शिक्षा म्हणून दिलीआहे असे समजू या. रोज सकाळी डबा घेऊन पळापळ करणारे लोक आज एका वेळेला dining टेबल वर बसून एकत्र जेवू लागलेत. बाबांचे काहीच न पटणाऱ्या पिंट्याला ‘बाबा पण कधी कधी सेन्सिबल असतात’ असे वाटू लागले. आई ने केलेल्या ताज्या जेवणाची चव ‘खरंच मस्त असते’ असे मिनीला पटले. या सारख्या अनेक गोष्टी नव्याने उलगडून समोर यायला लागल्यात दहा दिवसातच. दूर असलेल्या मुलांचे आई वडिलांना फोन येऊ लागलेत. नातवंडांशी व्हिडीओ कॉल रोज सुरु झालेत. नातेवाईकांची विचारपूस सुरु झाली. मालू मावशी केळझर ला एकटीच असते. जरा फोन करून बघू या का काय परिस्थिती आहे तिच्या कडे? शहरात पोटापाण्यासाठी रोजी चे काम करून राहणाऱ्या मजुरांची धाव घराकडे लागली. जायच्या साधनांच्या अभावी पायी पायी लांब दूर आपल्या घरी जायची त्यांची तयारी आहे. घरची ओढ दुसरं काय. 
 
माझं घर माझा गाव, माझा देश, माझी माणसं ही संकल्पना काय आहे. हीच ती कुटुंबाची संकल्पना,हीच ती भावना. या लॉक डाऊन च्या काळात, कुटुंबाची नव्याने ओळख करून देणारे आपलेही असेच अनुभव असतील तर लिहून पाठवा जरूर. त्यांच्या संकलनाने भारतीय समाजाच्या सामर्थ्याची नव्याने ओळख होईल आपली. 
 
उज्वला चक्रदेव