कौटुंबिक वादातून महिलेने पोलीस ठाण्यातच स्व:ताला पेटविले
नाशिकमध्ये कौटुंबिक वादातून एका महिलेने पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. उपचारासाठी कुटुंबियांनी महिलेस जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. समजूत घालूनही मुलगी आपल्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्याच्या रागातून ही घटना घडल्याचे सांगितले जाते आहे. हरजिंदर अमरीतसिंग संधू (४५, रा. टकले नगर, पंचवटी) असे पेटवून घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आमनप्रित संधू (27) हिचा कुटुंबियांनी तिच्या मनाविरुद्ध राजिंदर पड्डा (रायपूर, छत्तीसगड) याच्याशी 18 जानेवारी रोजी विवाह लावून दिला होता. तथापि, पतीने शिवीगाळ व मारहाण केल्याने ती सात दिवसानंतर नाशिकला मैत्रिणीकडे राहण्यास आली. दरम्यान, सासरच्या मंडळींनी रायपूर पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली. ती नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्यात तिला बोलावण्यात आले होते. पोलीस ठाण्यात येताच तिच्या वडिलांनी तिची समजूत काढली. मात्र, तिने सासरी जाण्यास नकार दिला व आईवडिलांकडे राहण्यासही नकार दिला. नाशिकमध्ये शिक्षण व नोकरी करुन राहणार असल्याचे तिने आईवडिलांना सांगितले. मुलगी निर्णयावर ठाम असल्याचे समजताच तिची आई तणावाखाली आल्या. दिवसभर आई, वडील, भाऊ तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ती निर्णयावर ठाम राहिली. ती आईवडिलांविरुद्धच तक्रार देण्यासाठी पंचवटी पोलिसांत आली असता तिच्या मागोमाग तिची आई आली. त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात येत पेटवून घेतले.